तासगाव पोलिसांनी आरोपी मुलाविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. आरोपी देखील अल्पवयीन असल्याने त्याची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्याची बाल न्याय मंडळासमोर चौकशी केली जाणार आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 17 वर्षीय आरोपी मुलगा आणि 8 वर्षीय पीडित मुलगी एकाच भागात राहतात. 28 जानेवारी रोजी आरोपीच्या घरी कुणीच नव्हतं. याचा फायदा घेत आरोपी चिमुकल्या मुलीला आपल्या घरी घेऊन आला. तिला खेळणं देण्याचं आमिष आरोपीनं दाखलं. पीडित मुलगी घरात आल्यानंतर आरोपी तिला गोड बोलून बेडरुममध्ये घेऊन गेला. याठिकाणी आरोपीनं तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
advertisement
तसेच घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारेन, अशी धमकीही आरोपीनं पीडित मुलीला दिली. आरोपीला घाबरून पीडितेनं कुणालाच काही सांगितलं नाही. मात्र या घटनेच्या 18 दिवसानंतर पीडितेनं घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मुलीसोबत घडलेला प्रकार समजल्यानंतर पीडितेच्या आईनं तातडीनं तासगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुलीसोबत घडलेला सर्व प्रकार तिने पोलिसांना सांगितला. पीडित मुलीच्या आईनं दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास केला जात आहे.
