हिंगोली : हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथील युवकाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाने मारहाण करून त्रास दिल्याचा आरोप करत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आकाश माणिकराव देशमुख असे मयत तरुणाचे नाव आहे. या तरुणाने आत्महत्येपूर्वी एक मेसेज टाईप करून नातेवाईकांना पाठवला आहे. या मेसेजमध्ये छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाने मारहाण करीत त्रास दिल्याचा आरोप केला आहे. या मेसेज मध्ये इतर साठ ते आठ जणांची नावे देखील लिहिली आहेत. संबंधित पोलीस उपनिरीक्षकासह इतरांवर कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा तरुणाच्या नातेवाईकांनी घेतला आहे.
advertisement
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आकाश माणिकराव देशमुख हा पानकनेरगाव इथं राहत होता. गेल्या तीन दिवसांपूर्वी तो छत्रपती संभाजीनगरहून त्याच्या गावी आला होता. तेव्हापासून तो बेपत्ता झाला. तो बेपत्ता झाल्याची तक्रार शुक्रवारी पोलिसात नोंदवण्यात आली. त्यानंतर नातेवाईक आणि पोलीस त्याचा शोध घेत होते.
आकाशचा मृतदेह पानकनेरगावाच्या शिवारात आढळला. त्याच्या मृतदेहाजवळ मोबाईलही सापडला असून त्यात काही मेसेजमधून धक्कादायक असा खुलासा झाला आहे. आत्महत्येआधी त्याने काही मेसेजही पाठवले होते. त्यात म्हटलं होतं की, संभाजीनगरच्या वाडोद बाजार पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक संभाजी खाडे यांनी मारहाण केली. एका मुलीला तिचा जबाब बदलायला दबाव टाकला. मुलीलासुद्धा मारहाण केलं. माझ्या भावालाही मारहाण केली. पोलिसांनी सर्वांकडून पैसेही घेतल्याचा उल्लेख मेसेजमध्ये आहे.
Kolkata Doctor Case : 150mg वीर्य, फ्रॅक्चर बाबत पोलिसांचा मोठा खुलासा
माझं जिच्यावर प्रेम होतं तिला पोलिसांनी ब्लॅकमेल केलं. मला झाडावरून खाली उतरवेपर्यंत सर्वांना अटक व्हायला हवी. उपनिरीक्षक खाडे यांना निलंबित करण्यात यावं असंही मेसेजमध्ये लिहिलं आहे. याशिवाय या मेसेजमध्ये आणखी काही लोकांची नावे लिहिण्यात आली आहेत. दरम्यान घटनास्थळी पोलीस पोचले असून या मयत तरुणावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वडोद बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आकाश देशमुख हा ड्रायव्हर म्हणून काम करत होता. त्याचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते. त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात त्याला काही दिवस तुरुंगातही ठेवलं होतं. आकाशने त्याच्या मेसेजमध्ये असंही लिहिलंय की या प्रकरणात पोलिसांनी तब्बल १२ ते १५ लाख रुपये खाल्ले. पोलिसांनी तिला पर्सनल व्हिडीओ आणि फोटो कोर्टात दाखवण्याची भीती दाखवत तिच्याकडून जबरदस्तीने जबाब नोंदवून घेतला असंही आकाशने मेसेजमध्ये लिहिलं आहे.