या फसवणुकीप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, या प्रकरणाचा सध्या पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव श्रीराम रावसाहेब गीते (वय 32, रा. परंडवाल चौक, देहूगाव; मूळगाव चिंचपूर पांगुळ, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) असे आहे. कॅनरा बँक तसेच एनएसडीएल पेमेंट बँकेच्या विविध अनोळखी खातेधारकांनी ही फसवणूक केली आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात ही घटना घडली होती.
advertisement
नेमकी कशी झाली फसवणूक
फिर्यादी त्यांच्या मोबाइलवर बँक ऑफ महाराष्ट्रचे महा मोबाईल प्लस अॅप वापरत असताना त्यांना पासवर्ड अपडेट करण्याची सूचना आली. त्यानंतर नवीन पासवर्ड टाकताच अॅप लॉगआऊट झाले. काही वेळातच त्यांच्या मोबाइलवर विविध व्यवहारांबाबतचे मेसेज येऊ लागले.यानंतर खात्याची तपासणी केली असता, त्यांच्या बँक खात्यातून 4 लाख 85 हजार रुपये, 50 हजार रुपये आणि 39 हजार रुपये अशा वेगवेगळ्या रकमा इतर खात्यांमध्ये वर्ग झाल्याचे निदर्शनास आले. तसेच एटीएम स्वॅपद्वारे 35 हजार रुपयांची रक्कम काढण्यात आल्याचेही समोर आले आहे.






