कर्मचाऱ्यांकडून उडावीउडवीची उत्तरं
सुमन जगन्नाथ घिगे (वय-62, रा. सोनगाव) यांना सोमवारी दुपारी छातीत कळ आल्यामुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांच्यासोबत त्यांचे पती जगन्नाथ शिंदे होते. दुर्दैवाने, मंगळवारी पहाटे सुमन यांचा मृत्यू झाला. याच वेळी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र गायब झाल्याचे त्यांच्या नातेवाईकांच्या लक्षात आले.
advertisement
या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेबद्दल ड्युटीवरील कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता, त्यांनी आपली जबाबदारी झटकली. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी थेट जिल्हा शल्यचिकित्सकाकडे धाव घेतली. मात्र, त्यांनीही समाधानकारक उत्तर न देता उडवाउडवीची उत्तरे दिली, ज्यामुळे नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे झाले.
दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. त्यामुळे सायंकाळी 6 वाजेपर्यंत मृतदेह रुग्णालयातच पडून होता. याच वेळी नातेवाईक गुन्हा दाखल करण्यासाठी बीड शहर पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले होते.
पूर्वीही अशा घटना घडल्या आहेत
यापूर्वीही जिल्हा रुग्णालयात अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत. प्रसूती झालेल्या मातेच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि मोबाईल चोरीला गेल्याची घटना घडली होती. त्यावेळी रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी चोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते आणि बीड शहर पोलीस ठाण्यात त्याची नोंदही झाली होती. तसेच, मृतदेहांच्या अंगावरील दागिने चोरीला गेल्याच्या तक्रारीही यापूर्वी आल्या होत्या, पण त्यांचा तपास लागला नाही. आता पुन्हा एकदा अशाच प्रकारची घटना घडल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर जोरदार टीका होत आहे.
हे ही वाचा : 'ही माझीच चूक आहे... आय ॲम सॉरी', म्हणत बड्या नेत्याच्या पुतण्याने घेतला गळफास; सुसाइड नोटमध्ये धक्कादायक खुलासा