या हल्ल्यात संबंधित विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या मांडीवर आणि पाठीवर खोल घाव झाले आहेत. त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहे. हल्ल्याची ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घटना गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील ओझ इन्स्टिट्यूटमध्ये घडली आहे. कार्तिक असं हल्ला झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. तर अटक केलेल्या आरोपीचं नाव जगदीश रचाड आहे. जखमी कार्तिक आणि आरोपी जगदीश रचाड याची मुलगी एकाच ट्यूशनमध्ये शिकायला आहेत. मागील काही काळापासून कार्तिकची आरोपीच्या मुलीसोबत जवळीक वाढली होता. तो संबंधित मुलीशी फोनवरून बोलत होता. ही बाब मुलीचे वडील जगदीश रचाडला समजली. यामुळे जगदीश रचाड रागावले. त्याने शाळेत येऊन याबाबत तक्रार केली.
advertisement
हा प्रकार समजल्यानंतर शिक्षकांनी मुलीसह तिच्या वडिलाला आणि संबंधित मुलाला समुपदेश करण्यासाठी एका रुममध्ये बोलावलं. याठिकाणी शिक्षक देखील उपस्थित होते. दोन्ही मुलांचं समुपदेशन सुरू असताना मुलीच्या वडिलांनी अचानक खिशातून चाकू काढला आणि मुलाच्या मांडीवर पाठीवर सपासप वार करायला सुरुवात केली. समुपदेशन सुरू असताना अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मुलगा स्वत:चा बचाव करू शकला नाही. आरोपीनं अवघ्या पाच सेकंदात सहा वार करत मुलाला रक्तबंबाळ केलं.
यावेळी शिक्षकाने घाबरून मुलीच्या वडिलांसमोर हात जोडले. तर मुलगी देखील घाबरली. या सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या हल्ल्यानंतर संस्थेत गोंधळ उडाला आणि जखमी विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी वडिलांना अटक केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.