पुणेकरांना दिलासा! 15 मिनिटांचा वेळ वाचणार, भिडे पुलावरील महत्त्वाचं काम अंतिम टप्प्यात
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Mohan Najan
Last Updated:
नदीपात्रातील विद्यमान भिडे पुलाच्या वरून हा नवा पादचारी पूल उभारण्यात येत असून त्यामुळे वाहतूक आणि पादचारी प्रवास दोन्ही अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहेत.
पुणे : शहरातील ऐतिहासिक पेठ भागाला डेक्कन परिसराशी जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेल्या बाबा भिडे पुलावर सध्या अत्याधुनिक पादचारी पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. हा पादचारी पूल पुणे मेट्रो (महामेट्रो)च्या शहरातील कनेक्टिव्हिटी सुधारण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा एक महत्त्वाचा भाग मानला जात आहे. मुळात नदीपात्रातील विद्यमान भिडे पुलाच्या वरून हा नवा पादचारी पूल उभारण्यात येत असून त्यामुळे वाहतूक आणि पादचारी प्रवास दोन्ही अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहेत.
महामेट्रो प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार या पुलाचे मुख्य स्ट्रक्चरल आणि लाँचिंगचे काम पूर्ण झाले आहे. सध्या पुलावर फिनिशिंग, विद्युत रोषणाई, रेलिंग तसेच इतर अंतर्गत सजावटीची कामे सुरू आहेत. हा प्रकल्प डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, 2025 मध्ये झालेल्या लांबलेल्या पावसामुळे आणि नदीपात्रातील काही तांत्रिक अडचणींमुळे कामाला विलंब झाला.
advertisement
सध्या बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी सुरू असून नागरिकांच्या गैरसोयी टाळण्यासाठी मेट्रो प्रशासनाने बहुतांश कामे रात्रीच्या वेळी करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे दिवसा वाहनचालकांना वाहतुकीचा फारसा अडथळा जाणवत नाही. हा पादचारी पूल केबल-स्टेड प्रकारचा असून त्याची एकूण लांबी सुमारे 108 मीटर आणि रुंदी 8 मीटर आहे. या पुलाच्या उभारणीसाठी अंदाजे 25 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला कोणताही अडथळा येऊ नये, याची विशेष काळजी घेत पुलाचे डिझाइन तयार करण्यात आले आहे.
advertisement
या पुलाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे पादचाऱ्यांना थेट डेक्कन मेट्रो स्टेशनच्या कॉनकोर्स लेव्हलवर, म्हणजेच तिकीट खिडकी असलेल्या मजल्यावर थेट प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे नारायण पेठ, शनिवार पेठ, लक्ष्मी रोड परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. पूर्वी पेठ भागातून डेक्कनकडे जाण्यासाठी 10 ते 15 मिनिटांचा वळसा घालावा लागत होता. आता मात्र केवळ 2 ते 3 मिनिटांच्या चालण्याने मेट्रो स्टेशन गाठणे शक्य होणार आहे.
advertisement
भिडे पुलावर वाहनांची मोठी वर्दळ असते. स्वतंत्र पादचारी पूल उपलब्ध झाल्याने अपघातांचा धोका लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. याआधी छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्टेशन ते शनिवार पेठ दरम्यान असाच पादचारी पूल पूर्ण होऊन सुरू झाला आहे. आता बाबा भिडे पुलावरील हा पूल कार्यान्वित झाल्यानंतर नदीच्या दोन्ही बाजूंची मेट्रो कनेक्टिव्हिटी पूर्ण होणार आहे. मात्र, हा पूल नेमका कधी सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला होतो, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 01, 2026 11:36 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुणेकरांना दिलासा! 15 मिनिटांचा वेळ वाचणार, भिडे पुलावरील महत्त्वाचं काम अंतिम टप्प्यात







