नवरीच्या पालकांच्या म्हणण्यानुसार, नववधू बाथरूममध्ये गेली होती, जिथे ती पाण्याच्या ड्रममध्ये पडलेली आढळली. तिला तातडीने वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. मृत्यूचे कारण जाणून घेण्यासाठी पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोस्टमॉर्टममध्ये मृत तरुणीच्या फुफ्फुसात पाणी आढळून आलं. आता व्हिसेरा अहवालाची प्रतीक्षा आहे. त्यानंतरच मृत्यूचं खरं कारण समोर येईल.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, ममता कुशवाह असं मृत वधूचं नाव असून तिचं वय 23 वर्षे आहे. ममताच्या पतीचं नाव सुरेंद्र कुशवाह आहे. ममता हिचं सासर मध्य प्रदेशातील निवारी जिल्ह्यात आहे. तर माहेर झाशीच्या घासपुरा गावात आहे. तिच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, 23 एप्रिल रोजी ममता हिचं लग्न मोठ्या थाटामाटात झालं होतं. 24 एप्रिल रोजी ती झाशी येथील तिच्या सासरच्या घरी गेली. जिथे लग्नानंतरचे विधी चालू होते. 25 किंवा 26 एप्रिल रोजी ती कमी जेवण करत असल्याचं समोर आलं.
27 एप्रिल रोजी रात्री ती बाथरूमला गेली होती. बराच वेळ ती बाथरूममधून बाहेर न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी जाऊन पाहिलं असता ती पाण्याच्या टाकीत पडल्याचं पाहून तिला तातडीने झाशी मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी आणण्यात आलं. मात्र तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. सध्या वधूचा मृत्यू कोणत्या परिस्थितीत आणि कसा झाला हे गूढच आहे.
कुटुंबीयांनी सांगितलं की, लग्न होऊन अवघे ४ ते ५ दिवस झाले होते. हातावरची मेंदीही गेली नव्हती. अनेक विधी अजून व्हायचे होते. मात्र लग्नानंतर चौथ्या दिवशी सासरच्या घरून आई-वडिलांच्या घरी आलेल्या नववधूचा अचानक मृत्यू झाला.
