शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. अनिता परितेकर या सीपीआरमध्ये मेडिसिन विभागाच्या प्रमुख आहेत, तर त्यांचे पती महापालिकेत अधिकारी आहेत. त्यांचा मुलगा महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. सोमवारी सकाळी परितेकर दाम्पत्य कामासाठी घराबाहेर पडले. त्यानंतर, 11 वाजता त्यांचा मुलगाही क्लासला गेला. दुपारी अडीचच्या सुमारास स्वयंपाकीण घरी आल्यावर त्यांना घराचा कडी-कोयंडा उचकटलेला दिसला आणि घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ फोन करून याची माहिती डॉ. परितेकर यांना दिली.
advertisement
घरी पोहोचल्यावर डॉ. परितेकर यांनी पाहिले असता, बेडरूममधील लाकडी कपाटातील तीन मंगळसूत्रे, कर्णफुले, सोन्याची साखळी, अंगठ्या, तोडे, ब्रेसलेट आणि हिऱ्यांचे टॉप्स असे एकूण 50 तोळ्यांचे दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. बाजारभावानुसार या दागिन्यांची किंमत सुमारे 55 लाख रुपये आहे.
चोरांनी चांदीच्या दागिन्यांना हात लावला नाही
चोरट्यांनी फक्त सोन्या-हिऱ्यांच्या दागिन्यांवरच डल्ला मारला. घरात असलेल्या चांदीच्या दागिन्यांना त्यांनी हातही लावला नाही. यावरून चोरटे सराईत असावेत आणि त्यांना मौल्यवान वस्तूंची चांगली ओळख असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सीसीटीव्ही बसवणार इतक्यात झाली चोरी
ज्या इमारतीत ही चोरी झाली, त्या 'अनंत प्राइड'मध्ये तळमजल्यावर एकच सीसीटीव्ही कॅमेरा आहे, पण तो गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. डॉ. परितेकर यांनी गेल्या महिन्यात त्यांच्या फ्लॅटबाहेर कॅमेरे लावण्यासाठी मागवले होते, पण वेळ न मिळाल्याने ते बसवता आले नव्हते. नेमकी याच संधीचा फायदा चोरट्यांनी घेतला.
डॉ. परितेकर यांच्या मुलीचे लग्न झाले आहे, पण त्यांनी मुलगा आणि नातीच्या लग्नासाठी हे दागिने मोठ्या प्रेमाने जपून ठेवले होते. त्यावरच चोरट्यांनी हात साफ केल्याने परितेकर कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येऊन पंचनामा केला. ठसेतज्ज्ञ आणि श्वानपथकाने तपास करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात यश आले नाही. पोलिसांनी फिर्याद घेऊन चोरट्यांचा शोध सुरू केला आहे, पण अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही.
हे ही वाचा : सासूच्या लफड्यामुळे डॉक्टर झाला कसाई, मर्डर करून मृतदेहाचे 19 तुकडे, जावयाचं थरकाप उडवणारं कृत्य
हे ही वाचा : आधी अंघोळ करताना वहिनीचा काढला व्हिडिओ, नंतर विकृत कृत्य; दिराचं मर्यादा ओलांडणारं कृत्य