कला केंद्रातील नर्तकीच्या प्रेमापायी गेवराई तालुक्यातील उपसरपंचाने स्वतःवर गोळी झाडून स्वत:ला संपवल्याचं प्रकरण समोर आलं होतं. त्यानंतर आता धाराशिवमधील प्रकरणाने खळबळ उडाली. स्टोन क्रशरवर काम करणाऱ्या आश्रुबा कांबळेचा जीव साई कला केंद्रातील नर्तकीवर जडला. मात्र, मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्याने आत्महत्या केली.
पूजावर जीव जडला, बायको सोडून गेली, आत्महत्या कोणत्या कारणाने?
advertisement
धाराशिव तालुक्यातील रुई ढोकी येथे राहणाऱ्या आश्रुबा अंकुश कांबळे यांच्या आत्महत्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. आश्रुबा येडशीजवळील यशोदा स्टोन क्रशरवर मजूर म्हणून काम करत होता. क्रशरपासून काही अंतरावर असलेल्या साई कला केंद्रात नर्तकी पूजा उर्फ आरती धम्मपाल वाघमारे (रा. हरंगुळ, जि. लातूर) हिच्याशी त्याचे प्रेमसंबंध होते. पूजा वारंवार आश्रुबाच्या घरी येत असायची, यामुळे आश्रुबा आणि त्याची पत्नी साक्षी यांच्यात वाद वाढत गेले. अखेर या धकाधकीला कंटाळून साक्षी माहेरी पुणे येथे गेली.
आश्रुबा आणि पूजा वाघमारे यांच्यातील पैशांच्या कारणावरूनही सतत भांडण होत होते. पूजाकडून वारंवार फोन करून साई कला केंद्रात बोलावणे आणि पैशांची मागणी सुरूच होती. या दबावामुळे आश्रुबाने घरातील सोने गहाण ठेवले आणि पोस्टातील आरडीदेखील मोडली. तरीही पैशांची मागणी सुरूच राहिल्याने आणि पत्नी घर सोडून गेल्यानंतर वाढलेल्या मानसिक ताणामुळे आश्रुबा गंभीर नैराश्यात गेला व अखेर गळफास घेऊन जीवन संपवले.
नर्तकी पूजाला अटक...
या प्रकरणी आश्रुबाच्या चुलत भावाने, भारत कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पूजाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे. घटनेच्या पहाटेच पूजाने आश्रुबाच्या बहीण छबुबाई यांना फोन करून आत्महत्येची माहिती दिली होती.
पोलिसांकडून आता या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पूजेसह या घटनेत आणखी कोणी सहभागी होते का, कला केंद्रातील आणखी कोणाचे संपर्क होते, याचा शोध घेतला जात आहे. तपासातून पुढील महत्त्वाची माहिती उघडकीस येण्याची शक्यता आहे.
