सुरुवात झाली ती एका महिला निवासी डॉक्टरच्या लैंगिक शोषणाच्या तक्रारीने. आरोपी डॉ. रमीज मलिक याच्यावर शोषणाचे आणि धर्मांतरणासाठी दबाव टाकल्याचे आरोप झाले. मात्र, जसा तपास पुढे सरकला, तसे या प्रकरणाचे गांभीर्य वाढत गेले. आता या प्रकरणात उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने (ATS) एन्ट्री केली असून, रमीजच्या संपूर्ण नेटवर्कचा 'कुंडली' शोधली जात आहे.
advertisement
तपासातील सर्वात धक्कादायक वळण म्हणजे रमीजचे डॉक्टर शाहीन सईदसोबत असलेले संबंध. शाहीन सईद हे नाव सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आधीपासूनच आहे, कारण तिला दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात अटक झाली होती. रमीजने चौकशीत कबूल केले आहे की, मेडिकल कॉन्फरन्सच्या नावाखाली त्याच्या शाहीनसोबत अनेक भेटी झाल्या होत्या. एका बलात्काराच्या आरोपाखाली अटक झालेल्या डॉक्टरचे धागेदोरे बॉम्बस्फोटातील आरोपीपर्यंत पोहोचल्याने यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
रमीजला अटक होण्यापूर्वी तो बराच काळ फरार होता. आश्चर्याची बाब म्हणजे, या काळात तो फक्त लपून बसला नव्हता, तर त्याने सहारनपूर, मेरठ, दिल्लीच्या शाहीन बाग आणि मुजफ्फरनगर अशा संवेदनशील भागांत प्रवास केला. या काळात त्याला अनेक डॉक्टरांनी आणि कायदेशीर सल्लागारांनी आश्रय दिल्याचे समोर आले आहे. हा केवळ वैयक्तिक मदतीचा भाग होता की एखाद्या संघटित 'रॅकेट'चा, याचा शोध एटीएस घेत आहे.
रमीजच्या एमबीबीएसच्या शिक्षणापासून ते केजीएमयू मधील नोकरीपर्यंतच्या काळातील अनेक परदेश दौऱ्यांची माहिती पोलीस गोळा करत आहेत. आग्रा येथे शिक्षण घेत असताना त्याने एका हिंदू मुलीशी निकाह केला होता, ज्यासाठी पीलीभीतच्या एका काझीने मदत केली होती. पोलीस आता त्या काझीचा आणि साक्षीदारांचा शोध घेत आहेत. केजीएमयूच्या हॉस्टेलमध्ये रमीजच्या एका जवळच्या ज्युनियर डॉक्टरच्या सांगण्यावरून नियमित 'तकरीर' व्हायची, ज्यातून विशिष्ट विचारसरणी पसरवली जात होती, असा संशय आहे.
केवळ रमीजच नाही, तर केजीएमयूच्या दोन महिला कर्मचारी आणि एक डॉक्टर सध्या पोलिसांच्या रडारवर आहेत. हे लोक मिळून एक 'धर्मांतरण रॅकेट' चालवत असल्याचा संशय बळावला आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे, पीडित महिलांनी यापूर्वी प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या, पण त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. केजीएमयू प्रशासनाची ही 'गप्प' राहण्याची भूमिका आता संशयाच्या भोवऱ्यात आहे.
या संपूर्ण नेटवर्कचा मुख्य सूत्रधार कोण आहे? रमीजला आर्थिक रसद कुठून मिळत होती? आणि केजीएमयू सारख्या प्रतिष्ठित संस्थेमध्ये हे सर्व कोणाच्या आशीर्वादाने सुरू होते? हे प्रश्न आता उत्तर प्रदेशच्या राजकारणात आणि प्रशासनात वादळ निर्माण करत आहेत. ज्या डॉक्टरांच्या हातात रुग्णांचे प्राण वाचवण्याची जबाबदारी असते, त्यांच्याच हातात जर धर्मांतरणाचे आणि शोषणाचे शस्त्र असेल, तर ही समाजासाठी धोक्याची घंटा आहे.
