छत्रपती संभाजीनगरमधील म्हैसमाळा परिसरात फिरायला गेलेल्या एका प्रेमयुगुलावर स्थानिक तरुणांच्या टोळक्याने निर्घृण हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित युवक-युवती फिरण्यासाठी म्हैसमाळा येथे गेले होते. त्यावेळी काही तरुणांच्या टोळक्याने त्यांना अडवले आणि नाव विचारले. युवकाने ओळख सांगितल्यावर त्याला बेदम मारहाण करण्यात आली. “तू दुसऱ्या धर्माच्या मुलीसोबत का फिरतोस? आपल्या धर्मात मुले नाहीत का?” असा प्रश्न विचारत आरोपींनी मुलीलादेखील बेदम मारहाण केली.
advertisement
अमानुषपणे बुक्क्यांनी होत असलेली मारहाण थांबवण्यासाठी तरुणीचा आक्रोश सुरू होता. माझं चुकलं, मला माफ करा असे ती म्हणत राहिली. मात्र, नराधमांनी तिला बेदम मारहाण करणे सुरू ठेवलं. इतकंच नाही तर तिच्या डोळ्यांदेखत तिच्या प्रियकरालादेखील मारहाण केली जात होती. या टोळक्यातील काही जणांनी मारहाणीचा व्हिडीओ रेकॉर्ड केला असल्याचे दिसून आले.
हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून, घटनेबद्दल संतापाची भावना व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी केली जात आहे. आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. ही घटना केवळ कायद्याचा धाक संपल्याचे द्योतक नाही, तर सामाजिक सलोख्यालाही धक्का देणारी असल्याचे म्हटले जात आहे.