मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २५ जून २०२५ च्या रात्रीच्या सुमारास घडली. पीडित विद्यार्थिनीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तिच्यावर कॉलेज कॅम्पसमध्ये संध्याकाळी साडेसात ते अकराच्या सुमारास सामूहिक बलात्कार झाला. या प्रकरणात कारवाई करत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींमध्ये एक माजी विद्यार्थी आणि दोन विद्यमान विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ही घटना कोलकात्यातील प्रसिद्ध साऊथ कोलकाता लॉ कॉलेजमध्ये घडली आहे.
advertisement
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी केली. तसेच तिचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित साक्षीदारांचे जबाबही नोंदवले आहेत. ज्या कॉलेजमध्ये ही घटना घडली त्या कॉलेजचा भाग सील करण्यात आला आहे. तसेच घटनास्थळाची फॉरेन्सिक टीमकडून तपासणी केली जात आहे.
कसबा पोलीस स्टेशनच्या पथकाने सिद्धार्थ शंकर शिशु रॉय उद्यानासमोरून दोन आरोपींना अटक केली, तर तिसऱ्या आरोपीला त्याच्या घरातून उचललं आहे. तिन्ही आरोपींचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून तांत्रिक पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलिसांनी सांगितले की, तिन्ही आरोपींना अलीपूर न्यायालयात हजर केले जाईल, जिथे त्यांची चौकशी करण्यासाठी पोलीस कोठडी मागितली जाईल.
या घटनेबाबत साऊथ कलकत्ता लॉ कॉलेज प्रशासनाकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. घटनेच्या संवेदनशीलतेमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संताप आहे. अनेक सामाजिक संघटनांनी कॉलेज कॅम्पसमधील सुरक्षा व्यवस्था आणि प्रशासनाच्या जबाबदारीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. या हायप्रोफाइल प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरून गेले आहे.