मुक्ताईनगर बोदवड मतदार संघातून अपक्ष उमेदवारी करणारे विनोद सोनवणे यांच्यावर मंगळवारी दुपारी अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून दहशत वाजवण्याचा प्रयत्न केला होता. या गोळीबार मागे कुठलाही राजकीय वाद नसून फक्त दहशत माजवून उमेदवाराकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न होता, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर श्रेड्डी यांनी दिली. तसेच विधानसभा निवडणुकीत निवडणूक लढविणाऱ्या 49 उमेदवारांना निवडणूक काळासाठी शस्त्रधारी अंगरक्षकाची सुरक्षा पुरविली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबतचा निर्णय जिल्हास्तरीय समितीने घेतला असल्याची माहिती देखील पोलीस अधीक्षक रेड्डी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
advertisement
याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या जिल्हास्तरीय समितीने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या जीवीताला असलेल्या धोक्याबाबत तपासणी करून एक शत्रधारी अंगरक्षक पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. यात जिल्ह्यातील 11 मतदारसंघातील 49 उमेदवारांना, अशा प्रकारची सुरक्षा आजपासून पुरविली जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी दिली. तसेच ही सुरक्षा केवळ निवडणूक काळासाठी राहणार असून भविष्यात पुन्हा सुरक्षा देण्याच्यादृष्टीने जिल्हास्तरीय समिती आवश्यक तो निर्णय घेणार असल्याचे डॉ. रेड्डी यांनी सांगितले.
गोळीबार प्रकरणावरून खडसेंची टीका...
गेल्या दहा पाच वर्षांमध्ये मुक्ताईनगर तालुक्यामध्ये गुंडगिरी वाढलेली आहे, प्रत्येक गावामध्ये दहा पाच गुंडे निर्माण झाले आहेत तेही पोलिसांच्या संरक्षणामुळे झाले असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी केली. या गोळीबारामुळे मुक्ताईनगर तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था किती बिघडली आहे हे दिसून येत आहे अशी प्रतिक्रिया खडसे यांनी दिली.
