पोलिसांच्या माहितीनुसार, हेमंत शर्माने पत्नीच्या खुनाचा कट रचला व त्याला रस्त्यावरच्या अपघाताचं रूप दिलं. त्याच्या एका चुकीमुळे घटनेचा पर्दाफाश झाला. त्याने पत्नीचा खून करायला मित्रांना अडीच लाख रुपये दिले होते. घटनेच्या दिवशी कटाचा भाग म्हणून हेमंत पत्नी दुर्गावती व तिचा भाऊ संदेशला मंदिरात घेऊन गेला. परत येताना हेमंतच्या एका मित्राने इकोस्पोर्ट कारने जाणूनबुजून दुर्गावती व तिच्या भावाच्या बाइकला धडक दिली. यात दुर्गावती गंभीर जखमी झाली, रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेत संदेश जखमी झाला आहे.
advertisement
घटनेचा पर्दाफाश कसा झाला
हेमंत शर्माने याबाबत हिट-अँड-रनची तक्रार दिली. लोडिंग वाहन बाइकला धडकल्याने अपघात झाला आणि यात पत्नीचा मृत्यू झाला, असं त्याने म्हटलं; पण त्याच्या जबाबात खूप चुका होत्या. त्यामुळे पोलिसांना संशय आला. परिसरातलं सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केल्यानंतर बाइकला कोणतंही लोडिंग वाहन धडकल्याचं पोलिसांना आढळलं नाही. टक्कर होण्यापूर्वी पोलिसांना एक इकोस्पोर्ट कार बाइकच्या मागून येताना दिसली. त्यामुळे पोलिसांना संशय आला आणि त्यांनी तपास केला. शर्माच्या वैवाहिक जीवनाबद्दल कळाल्यावर पोलिसांना धक्का बसला.
पोलीस तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, मृत दुर्गावती ही हेमंत शर्माची दुसरी पत्नी आहे, पहिली पत्नी मुरैना इथल्या वडिलोपार्जित घरात राहते. हेमंत आणि दुर्गावती यांचे 2017पासून प्रेमसंबंध होते, तेव्हा दोघेही परीक्षेची तयारी करत होते. 2021मध्ये दुर्गावतीच्या वडिलांनी तिचं दुसऱ्याशी लग्न केलं. 2022मध्ये हेमंतचंही दुसरीशी लग्न झालं. त्यानंतर हेमंत आणि दुर्गावती दोघेही आपापले आयुष्य जगू लागले.
हेमंतच्या लग्नानंतर काही दिवसांनी दुर्गावतीने अचानक पतीला घटस्फोट दिला आणि ती परत आली. नंतर पुन्हा दुर्गावती आणि हेमंत एकमेकांच्या संपर्कात आले. प्रेम पुन्हा फुललं आणि 2023मध्ये त्यांनी कोर्टात लग्न केलं. लग्नानंतर दोघेही पडाव परिसरातल्या साकेतनगरमध्ये राहू लागले. त्यांच्या आयुष्यात सगळं नीट चाललं असताना दुर्गावतीच्या जास्त खर्चाच्या सवयीमुळे नात्यात कडवटपणा आला.
वाचा - तहसील कार्यालयातच भाजप नेत्याच्या मुलाची काँग्रेस कार्यकर्त्याला मारहाण
हत्येचं कारण काय?
पत्नीच्या जास्त खर्चाच्या सवयीमुळे वैतागलेल्या हेमंतने रागाच्या भरात तिला संपवण्याचा कट रचला. अपर पोलीस अधीक्षक निरंजन शर्मा यांनी हत्येच्या कटात शर्माच्या तीन मित्रांचा सहभाग असल्याची माहिती दिली आहे. पोलिसांनी शर्मा आणि कारचालकाला अटक केली आहे, तर कटात सहभागी असलेले इतर दोघे फरार आहेत.