या प्रकरणी पोलिसांनी आई भारती उमेश साबळे (वय 35) आणि सावत्र वडील उमेश गोविंद साबळे (वय 40, रा. वडगाव कोल्हाटी) यांना ताब्यात घेतले आहे. माहितीनुसार, नंदिनीने काही महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता. सुरुवातीचा संसार सुरळीत सुरू असला, तरी दोन-तीन महिन्यांपूर्वी पतीने तिला सोडून दिल्याने ती माहेरी परतली. या घटनेचा तिच्यावर मानसिक परिणाम झाल्याचे स्थानिकांकडून सांगितले जाते. दरम्यान, पतीपासून विभक्त झाल्यानंतर तिचे दुसऱ्या एका तरुणाशी संबंध जुळल्याची माहिती पुढे आली. या नव्या नात्यामुळे घरात वारंवार वाद होत असल्याचेही उघड झाले आहे.
advertisement
‘समाजात बदनामी होईल, लोक काय बोलतील?’ या भीतीने आई संतप्त होती, असे तपासात समोर आले आहे. सुमारे वीस दिवसांपूर्वी आई-मुलगी वडगाव कोल्हाटी येथे राहायला आल्या होत्या. शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या घरातून नेहमी भांडणांचे आवाज येत असत; मात्र परिस्थिती इतकी टोकाला जाईल, याची कल्पना कोणालाही नव्हती.
घटनेच्या दिवशी दुपारी अंदाजे 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास बाथरूममध्ये प्लास्टिक पाईपने गळा आवळून नंदिनीची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. संतापाच्या भरात आई भारती साबळे हिने हे पाऊल उचलल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यानंतर मृतदेह गादीत गुंडाळण्यात आला. रात्री सुमारे 10.40 वाजता संशयास्पद हालचाली लक्षात आल्याने नागरिकांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी वाहन अडवून तपासणी केली असता गादीत गुंडाळलेला नंदिनीचा मृतदेह आढळला.
तपासात मृतदेह कन्नड घाट परिसरात नेऊन ड्रममध्ये टाकून जाळून पुरावे नष्ट करण्याचा कट रचण्यात आल्याचेही समोर आले आहे. मात्र पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केल्याने हा प्रयत्न उधळला गेला. हत्या घडली त्या वेळी सावत्र वडील उमेश साबळे घराबाहेर असल्याचे सांगितले जात असले, तरी नंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास त्यांनी मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांनाही सहआरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. त्यांच्या पथकात पोलीस अंमलदार राजाराम वाघ, संदीप तागड, समाधान पाटील, नितीन इनामे, जयेश साळुंखे, हनुमान ठोके, वैभव गायकवाड, सुहास मुंडे, गजानन कसबेवाड, लखन गुसिंगे आणि शिव नागरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मोबाईल कॉल रेकॉर्ड, नातेसंबंधांची पार्श्वभूमी तसेच घटनास्थळावरील पुराव्यांची सखोल तपासणी सुरू असून, पुढील चौकशीत आणखी तपशील समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.






