महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील एका सरकारी कर्मचाऱ्याला WhatsApp वर लग्नाचं डिजिटल कार्ड पाठवून तब्बल 1.90 लाखांची फसवणूक झाली आहे. सायबर सेलमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि अज्ञात आरोपीवर गुन्हा नोंदवला आहे.
कसा घडला प्रकार?
सरकारी कर्मचाऱ्याला एका अनोळखी नंबरवरून WhatsApp वर लग्नाचं आमंत्रण आलं. मेसेजमध्ये “लग्नात जरूर या, 30 ऑगस्ट 2025 ला सोहळा आहे” असं लिहिलं होतं.
advertisement
सोबत एक PDF फाइल जोडली होती, ज्याचं नाव Wedding Invitation Card होतं. फाइल उघडताच कर्मचाऱ्याच्या फोनमध्ये APK (Android Application Package) इन्स्टॉल झाला.
खरं तर ती PDF नसून मालवेअरने भरलेली APK फाइल होती. फाइल ओपन होताच मालवेअर फोनमध्ये बसलं आणि ठगांना बँक डिटेल्स आणि वैयक्तिक माहिती मिळाली.
यानंतर त्यांच्या खात्यातून जवळपास 1.90 लाख रुपये गायब झाले.
पोलिसांचा इशारा
या घटनेनंतर हिंगोली पोलिस आणि सायबर सेलने लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे:
अनोळखी नंबरवरून आलेली लिंक, फोटो किंवा फाइल कधीही उघडू नका. अशा फाइल्समध्ये व्हायरस असू शकतो ज्यामुळे तुमचा फोन हॅक होऊ शकतो. विशेषतः अनोळखी लग्नाचं आमंत्रण कार्ड किंवा इतर फाइल्स उघडण्यापासून टाळा. जर कुणाच्या खात्यातून पैसे गेले तर त्वरित सायबर हेल्पलाइन 1930 वर कॉल करून तक्रार करा.
