मी बुडतोय... प्लीज मला वाचवा....
27 वर्षांचा युवराज मेहता गुरुग्राममधील एका खासगी आयटी कंपनीत कार्यरत होता. सेक्टर-150 मध्ये एका निर्माणाधीन मॉलच्या उघड्या बेसमेंटमध्ये युवराजची विटारा कार कोसळली. रिफ्लेक्टर नसल्याने युवराजला रस्त्यावरील त्या मृत्यूच्या सापळ्याचा अंदाज आला नाही. कार पाण्यात कोसळताच युवराजने आपल्या वडिलांना फोन केला आणि "पप्पा, मी खोल खड्ड्यात पडलो, मी बुडतोय... प्लीज मला वाचवा, मला मरायचे नाहीये," अशी आर्त हाक मारली. पण ढिल्ली सिस्टिम अन् मृत्यूच्या दारातून त्याला वाचवता आलं नाही.
advertisement
टॉर्चच्या साह्याने मदतीसाठी ओरडत होता...
वडील राजकुमार मेहता घटनास्थळी पोहोचले तेव्हा युवराज कारच्या टॅबवर उभा राहून टॉर्चच्या साह्याने मदतीसाठी ओरडत होता. मात्र, गोठवणाऱ्या थंडीमुळे आणि खोल पाण्यामुळे तिथे उपस्थित असलेल्यांपैकी कोणीही त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उतरण्याचं धाडस दाखवलं नाही. खोल पाण्याच्या भीतीमुळे कोणीही आत उडी मारली नाही. पण पोलिसांनी रस्ती टाकून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला पण काळोख्या अंधारात काहीही दिसलं नाही.
वडिलांच्या डोळ्यादेखत बुडाला
युवराज जवळजवळ अडीच तास मदतीची वाट पाहत होता. प्रत्यक्षदर्शींच्या मते, अधिकाऱ्यांकडे पुरेसे गोताखोर किंवा योग्य उपकरणे नव्हती. डिलिव्हरी एजंट असलेल्या मोनिंदरने उल्लेखनीय धाडस दाखवले. त्याने कंबरेला दोरी बांधली आणि 70 फूट खोल पाण्यात उडी मारली. पण पहाटे 1:45 वाजताच्या सुमारास गाडी पूर्णपणे पाण्यात बुडाली आणि युवराज त्याच्या वडिलांच्या डोळ्यादेखत बुडाला.
PM रिपोर्टमध्ये काय समोर आलं?
दरम्यान, पोस्टमार्टम रिपोर्टमधून या घटनेचा अधिक धक्कादायक खुलासा झाला आहे. बर्फासारख्या थंड पाण्यात दोन तास मृत्यूशी झुंज देत असताना आणि भीतीमुळे युवराजला 'कार्डियक अरेस्ट' (हृदयविकाराचा झटका) आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. सुमारे दोन तास मदतकार्य उशिरा सुरू झाल्याने आणि प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे एका होतकरू तरुणाचा दुर्दैवी अंत झाला, ज्यामुळे स्थानिकांमध्ये मोठा संताप व्यक्त होत आहे.
