प्रियंका खुशाल भदाणे असं हत्या झालेल्या विवाहित महिलेचं नाव आहे. तर खुशाल भदाणे असं आरोपी पतीचं नाव आहे. खुशाल याने चारित्र्याच्या संशयातून ही हत्या केली असावी, असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र अद्याप पोलिसांनी हत्येच्या कारणाची पुष्टी केली नाही. तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यातील जारगाव याठिकाणी घडली. खुशाल भदाणे या तरुणाने कौटुंबिक वादातून आपल्या पत्नी प्रियंका भदाणे हिची चाकूने गळा चिरून आणि पोटात वार करून निर्घृण हत्या केली. प्रियंका हिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज पहाटे घडली. ही घटना घडत असताना प्रियंका "मला वाचवा, मला वाचवा" असा आरडाओरडा करत होती. आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पतीचा कांड पाहून गावकरी हादरले.
advertisement
याच वेळी पती खुशाल भदाणे याने देखील गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्याचा जीव वाचला. खुशाल भदाणे याने पत्नीचा खून नेमका का केला? हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक माहितीवरून चारित्र्याचा संशयातून हे हत्याकांड घडल्याचं सांगितलं जातंय. पोलीस निरीक्षक राहुल पवार यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.
