ही घटना शुक्रवार रात्री घडली. हरियाणवी गायक मासूम शर्मा यांच्या कार्यक्रमादरम्यान दोन गटांमध्ये वाद झाला. शोदरम्यानच वाद उफाळून काही वेळानंतर एका गटाने दुसऱ्या गटावर हल्ला चढवला. या हल्ल्यात आदित्य ठाकूरवर चाकूने वार करण्यात आला. ज्यात त्याचा मृत्यू झाला.
काय घडले नेमके?
पंजाब युनिव्हर्सिटीच्या यूआयटी दुसऱ्या वर्षात शिकणारा आदित्य ठाकूर हा त्याच्या मित्रांसोबत कार्यक्रम पाहण्यासाठी आला होता. शोदरम्यानच त्यांचा दुसऱ्या गटाशी किरकोळ वाद झाला आणि झटापट झाली. आदित्य आणि त्याचे मित्र कार्यक्रमाच्या ठिकाणाहून निघून गेले. पण दुसऱ्या गटाने काही साथीदारांना बोलावून त्यांच्यावर पुन्हा हल्ला केला.
advertisement
हल्ल्यात आदित्यला गंभीर जखमी करून PGI हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या हल्ल्यात आदित्यचा मित्र अनिरुद्धच्या गळ्यावर चाकूने वार करण्यात आला असून तो अजूनही गंभीर अवस्थेत आहे. तर दुसरा मित्र अर्जुनलाही चाकूचे घाव लागले आहेत, त्याच्यावरही उपचार सुरू आहेत.
पोलिसांचा तपास सुरू, अद्याप कोणतीही अटक नाही
या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र आरोपींची ओळख पटलेली नाही. विद्यापीठ प्रशासन आणि पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपींच्या शोधासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासली जात आहेत.
आदित्य ठाकूर हा होशियारपूर जिल्ह्यातील तलवाडा गावचा रहिवासी होता. त्याचे वडील हिमाचल प्रदेशातील नालागड येथे नोकरी करतात. पण कुटुंब तलवाडामध्ये वास्तव्यास आहे.
विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण
या घटनेनंतर विद्यापीठ परिसरात तणाव निर्माण झाला असून, विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विद्यार्थी संघटनांनी सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
विद्यापीठ प्रशासन आणि पोलीस यावर कठोर कारवाई करतील, असे आश्वासन दिले जात असले तरी या घटनेमुळे विद्यापीठाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.