एका तरुणाने आपल्या सख्ख्या मामावर जीवघेणा हल्ला केला आहे. आरोपीनं संपत्तीच्या वादातून मामावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात मामा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भाच्यानेच अशाप्रकारे मामावर हल्ला केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा सविस्तर तपास केला जात आहे.
advertisement
ही घटना संभाजीनगरच्या पुंडलिकनगर भागात घडली आहे. संतोष आरक असं हल्ला झालेल्या मामाचं नाव आहे. तर ओम शिंगारे असं हल्लेखोर भाच्याचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी भाचा ओम शिंगारे आणि मामा संतोष आरक यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. आईला घरातील हिस्सा द्यावा, अशी मागणी भाचा आपल्या मामाकडे करत होता. पण मामा घरातील संपत्तीचा हिस्सा द्यायला तयार नव्हता.
घटनेच्या दिवशी देखील दोघांमध्ये याच कारणावरून वाद झाला. दोघांमधील वाद विकोपाला गेल्यानंतर भाचा ओम शिंगारे याने धारदार शस्त्राने मामावर हल्ला केला. या हल्ल्यात मामा गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी मामा संतोष आरक यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. तसेच गुन्हा दाखल करत तातडीने भाच्याला बेड्या ठोकल्या आहेत. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
