बारावीच्या चाचणी परीक्षेत कमी गुण आल्याच्या कारणावरून एका वडिलांनी आपल्या 17 वर्षीय मुलीला इतक्या अमानुषपणे मारहाण केली. या मारहाणीत तिचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी रात्री घडली असून, रविवारी आरोपी वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे.
मृत मुलीचं नाव साधना धोंडीराम भोसले आहे. साधना ही आटपाडीतील एका कॉलेजमध्ये विज्ञान शाखेची बारावीची विद्यार्थिनी होती. तिचे वडील धोंडीराम भोसले हे नेलकरंजीतील एका खासगी शिक्षण संस्थेत शिक्षक आहेत.
advertisement
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साधनाला अलीकडे झालेल्या चाचणी परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले होते. ही बाब लक्षात आल्यानंतर वडील धोंडीराम भोसले प्रचंड संतापले. त्यानंतर त्यांनी शुक्रवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास घरातच जात्याच्या लाकडी खुंट्याने तिला बेदम मारहाण केली. शरीराच्या अनेक भागांवर वार झाल्याने साधना गंभीर जखमी झाली. काही वेळातच तिचा मृत्यू झाला.
घटनेनंतर मृत मुलीचा अंत्यविधी पार पाडण्यात आला. मात्र, त्यानंतर मुलीच्या आई प्रीती धोंडीराम भोसले (वय 41) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यावरून अटपाडी पोलिसांनी आरोपी वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या प्रकारामुळे नेलकरंजी गावात हळहळ व्यक्त होत असून, एका शिक्षकाकडून घडलेला हा अमानुष प्रकार समाजाच्या मानसिकतेबाबत अनेक प्रश्न उपस्थित करत आहे.
