परळीत मुंडे गँगकडून मारहाण झालेल्या तरुणाची प्रतिक्रिया
न्यूज १८ लोकमतशी संवाद साधताना शिवराज म्हणाला, मी माझ्या मित्रांसोबत अखंड हरिनाम सप्ताहाला गेलो होतो. त्या ठिकाणी काही लोकांचं भांडण झालं होतं. मला त्या संदर्भात काहीच माहिती नव्हती. परंतु त्यानंतर मी गावी परतत असताना आमच्या दुचाकीला चार ते पाच जणांनी अडवलं. त्यांनी मला दुसऱ्या दुचाकीवर बसवून रत्नेश्वर मंदिराच्या परिसरात घेऊन गेले. त्या ठिकाणी मला लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. मारहाण करताना ते याचा संतोष देशमुख पार्ट टू करू असं म्हणत होते.
advertisement
ही मारहाण होत असताना काही लोक माझ्या मदतीला आले. त्यांनी मला त्यांच्या तावडीतून सोडवले नसतं, तर त्या पोरांनी मला जिवंत सोडले नसते. त्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी, अशी प्रतिक्रिया शिवराज दिवटे यानं दिली. दरम्यान आता जखमी असलेल्या शिवराज याची भेट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते राजेसाहेब देशमुख यांनी देखील घेतली असून त्यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला. यावर ठोस पावले उचलत यातील आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी सात आरोपींना अटक केली असून जखमी शिवराज याच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वीस जणांवर गुन्हा दाखल
याप्रकरणी परळी संभाजीनगर पोलीस ठाण्यात समाधान मुंडे, रोहित मुंडे, आदित्य गीते, ऋषिकेश गिरी, प्रशांत कांबळे, सन्मित्र शिंदे, सौमित्र गोरे, रोहन वगळकर, सुरज मुंडे, स्वराज्य गीते असे दहा आरोपी आणि अनोळखी दहा अशा एकूण वीस जणांवर बीएनएस कलम 109, 126(2), 140(3), 118(1),189(2),189(4),190, 191(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास संभाजीनगर पोलीस करत आहेत.