काल बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमध्ये एका विद्यार्थ्याचं अपहरण करून त्याला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना ताजी असताना आता माजलगावात खंडणीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीडच्या माजलगावमध्ये चार जणांनी बंदुकीचा धाक दाखवत आइसक्रीम विक्रेत्याला लुटलं आहे. आरोपींनी आइसक्रीम विक्रेत्याला बेदम मारहाण करत त्याच्याकडून खंडणी वसूल केली आहे. माजलगाव शहर पोलीस ठाण्यात चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
योगेश तोर असं फिर्याद आइसक्रीम विक्रेताचं नाव आहे. त्यांचे माजलगाव शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरात आइसक्रीम पार्लर आहे. या ठिकाणी आरोपी जालिंदर गायकवाड आणि तात्यासाहेब जाधव यांच्यासह इतर दोघांनी येऊन खंडणी मागितली. तोर यांनी पैसे देण्यास नकार देताच चारही आरोपींनी त्यांना बेदम मारहाण करत पैसे वसूल केले. मागील काही दिवसांपासून चारही आरोपी वारंवार अशाप्रकारे वसुली करत होते.
आरोपींच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित आइसक्रीम विक्रेते योगेश तोर यांनी माजलगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. माजलगाव शहर पोलिसांनी चारही जणांविरोधात खंडणीसह मारहाण आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. चारही आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. एकीकडे खंडणी प्रकरणातून संतोष देशमुख यांची झालेली हत्येची घटना ताजी असताना बीडमध्ये सातत्याने 'बीड, बंदूक आणि बेबंदशाही' हे समीकरण दिसून येत आहे.
