संदीप रावसाहेब सावंत आणि सौरभ संदीप सावंत असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. तर राहुल अप्पासाहेब सूर्यवंशी असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. आरोपी संदीप सावंत आणि मयत राहुल सूर्यवंशी हे दोघंही नात्याने मामा-भाचे लागतात. दोघांचं घरही एकमेकांच्या घराशेजारी आहे. पण त्यांच्यात मागील काही काळापासून जमीनीचा वाद आहे. दोन्ही कुटुंबात वैर आहे.
advertisement
असं असताना घटनेच्या दिवशी मयत राहुल याने मामा संदीप सावंत यांच्या मुलीची छेड काढली होती. ही बाब मामाला कळाल्यानंतर दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. यानंतर मामाने आपला मुलगा सौरभ याच्या मदतीने राहुलला गाठलं. दोघांनी लोखडी पाईप आणि दगडाने राहुलला बेदम मारहाण केली. ही मारहाण इतकी बेदम होती की घटनास्थळीच भाच्याचा रक्ताच्या थारोळ्यात पडून मृत्यू झाला. भरदुपारी हा धक्कादायक प्रकार घडला.
या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली. मामाने असं निर्घृणपणे भाच्याची हत्या केल्यानं परिसरात दहशत निर्माण झाली. या प्रकरणाची माहिती मिळताच कुपवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर त्यांनी मयत राहुलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करत आरोपी मामा संदीप सावंत आणि मामेभाऊ सौरभ सावंत यांना अटक केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
