६ वर्षांच्या कमल हसनचा विक्रम!
कमल हसन यांनी वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी त्यांचा पहिला चित्रपट ‘कलाथुर कन्नम्मा’ साठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकला होता. १९६० मध्ये मिळालेला हा ‘प्रेसिडेंट गोल्ड मेडल’ पुरस्कार भारतीय सिनेमातील एक अद्भुत गोष्ट होती. इतक्या लहान वयात राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे ते पहिले बालकलाकार होते आणि हा रेकॉर्ड तब्बल ६५ वर्षे टिकून राहिला.
advertisement
चार वर्षांच्या त्रिशाची कमाल!
कमल हसन यांचा हा मोठा विक्रम मोडला आहे तो मराठमोळ्या त्रिशा ठोसरने. त्रिशाने तिच्या ‘नाळ २’ या मराठी चित्रपटातील ‘चिन्नी’च्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकला आहे. या पुरस्कार सोहळ्यातील हा अतिशय खास क्षण ठरला.
ही गोष्ट कमल हसन यांना कळताच, त्यांनी त्रिशाचं भरभरून कौतुक केलं. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी लिहिलं, “माझी प्रिय त्रिशा ठोसर, तुम्हाला खूप खूप प्रोत्साहन! तुम्ही माझा विक्रम मोडला आहे. मी ६ वर्षांचा असताना मला पहिला पुरस्कार मिळाला होता. तुमच्यासमोर खूप मोठा प्रवास आहे. तुमच्या कुटुंबालाही माझ्या शुभेच्छा!” कमल हसनच्या या पोस्टनंतर चाहते त्रिशावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात शाहरुख खान, राणी मुखर्जी, मोहनलाल आणि विक्रांत मॅसी यांसारख्या मोठ्या कलाकारांनाही पुरस्कार मिळाले, पण चार वर्षांच्या त्रिशाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.