मैत्रीतून 'लिव्ह-इन' आणि घडलं भयंकर
३६ वर्षीय या अभिनेत्रीने आपल्या तक्रारीत सांगितले आहे की, २०१८ पासून ती अरविंद रेड्डीला ओळखत होती आणि २०२२ मध्ये त्यांची भेट श्रीलंकेतील एका कार्यक्रमात झाली. सुरुवातीला दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध होते, पण लवकरच या नात्याचे रूपांतर लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये झाले. रेड्डी सुरुवातीला प्रेमाचे नाटक करायचा, पण काही दिवसांतच त्याचा खरा चेहरा तिच्या समोर आला.
advertisement
रेड्डी अनेकदा नशेत घरी यायचा. त्याचा स्वभाव हळूहळू आक्रमक, नियंत्रक आणि वेड लागलेल्या प्रियकरासारखा झाला. सततच्या भांडणांमुळे अभिनेत्रीने त्याच्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्रीने संबंध तोडण्याचा प्रयत्न करताच रेड्डीचे वागणे अधिक भयानक झाले. त्याने अभिनेत्रीचा छळ सुरू केला.
अभिनेत्रीचं आयुष्य झालं उद्ध्वस्त, केला आत्महत्येचा प्रयत्न
रेड्डीने तिचा सतत पाठलाग करणे, तिचे लोकेशन ट्रॅक करणे आणि तिच्या खासगी फोटोंमध्ये फेरफार करून इंस्टाग्रामवर पोस्ट करणे सुरू केले. आरोपीने अभिनेत्रीला सार्वजनिकरित्या अपमानित केले. तिच्या लहान भावाला जीवे मारण्याची धमकी दिली. एप्रिल २०२४ मध्ये, या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून अभिनेत्रीने आपल्या घरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा तो तिच्यावर जबरदस्तीने लग्नासाठी दबाव टाकत होता.
या छळात भर घालत आरोपीने अभिनेत्रीकडे एक कोटी रुपयांची मागणी केली. त्याने कुटुंबासमोर तिची जाणीवपूर्वक बदनामी करून तिला आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला.
अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर १७ ऑक्टोबर रोजी बंगळूरच्या राजराजेश्वरी नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाच्या तपासानंतर, पोलिसांनी शनिवारी १५ नोव्हेंबर रोजी गोविंद राजनगर परिसरातून आरोपी अरविंद व्यंकटेश रेड्डीला अटक केली आहे आणि त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
