अजित पवारांची कामाची पद्धत जितकी कडक होती, तितकाच त्यांचा स्वभाव संगीताच्या बाबतीत रसिक होता. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी संगीताबद्दल आपले मत मांडले होते, जे आज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दादा म्हणाले होते, "कोण कसलं गाणं म्हणतंय, काय म्हणतंय याच्याशी मला काही घेणं देणं नाही, फक्त कानाला ऐकायला चांगलं वाटतंय ना, मग ते ऐकायचं."
advertisement
हे विधान त्यांच्या साध्या आणि सरळ विचारांचे प्रतीक आहे. राजकारणातील किचकट समीकरणे सोडवणाऱ्या या नेत्याला संगीतातून मिळणारा आनंद हा निव्वळ 'स्वर' आणि 'अनुभूती'वर आधारित होता.
बॉलिवूडबद्दलच्या आवडीचा उल्लेख करताना त्यांनी स्वतः एका प्रसंगी सांगितले होते की, 90 च्या दशकातील सुपरहिट चित्रपट 'दिवाना' मधील "तेरी उम्मीद तेरा इंतजार करते है" हे त्यांचे अतिशय आवडते गाणे आहे. हे गाणं ऐकताना ते हरवून जायचे. एका स्ट्रिक्ट आणि सिरियस नेत्याची पसंती अशा रोमँटिक गाण्याला असावी, हे अनेकांसाठी आश्चर्याचे असले तरी, ते दादांच्या मनातील संवेदनशीलता दर्शवते.
"लोकांना वाटतं की आम्ही फक्त फाईल्स आणि आकड्यांमध्येच रमतो, पण संगीताचे सूर आम्हालाही तितकीच ऊर्जा देतात," असे जणू त्यांच्या या आवडीतून दिसून येत असे.
विमानाने हिरावला लोकनेता
अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूच्या बातमीने महाराष्ट्र हळहळला. एका विमान अपघातात त्यांचा अंत झाला आणि राजकारणातील एका युगाचा शेवट झाला. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. पण आज जेव्हा लोक त्यांच्या कामासोबतच त्यांच्या या व्हायरल व्हिडीओची चर्चा करत आहेत, तेव्हा असं वाटतं की दादा फक्त शिस्तप्रिय प्रशासक नव्हते, तर ते आपल्यासारखेच एक सामान्य व्यक्ती होते ज्यांना आपल्या रिकाम्यावेळेत गाणी ऐकायला ही आवडायचं.
आठवणींचे सूर...
अजित पवारांनी वेळोवेळी बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीबद्दल आपले प्रेम व्यक्त केले होते. कलाकार असोत किंवा गायक, त्यांच्या पाठीशी उभे राहण्यात दादा नेहमीच पुढाकार घेत. आज अजित पवार आपल्यात नाहीत, पण त्यांचं ते रोखठोक बोलणं आणि "तेरी उम्मीद..." म्हणताना त्यांच्या चेहऱ्यावर आलेला तो दुर्मिळ आनंद सदैव महाराष्ट्राच्या स्मरणात राहील. 'दादां'ना त्यांच्या आवडत्या स्वरांच्या साक्षीनेच ही भावपूर्ण श्रद्धांजली.
