दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर भारती सिंहची वाईट अवस्था
भारती सिंग सध्या पोस्टपार्टम डिप्रेशन या मानसिक स्थितीचा सामना करत आहे. आई झाल्यानंतर अनेक स्त्रियांमध्ये दिसणारी ही समस्या भारतीने जगासमोर उघडपणे मांडली आहे. ती म्हणते, "मी आत्ताच रडले आहे. पण का रडू आलं? हे मलाच माहीत नाही. बसल्या बसल्या अचानक डोळ्यात पाणी येतंय. रात्रीची झोप उडाली आहे आणि मन सारखं अस्वस्थ असतंय."
advertisement
अनेकांना वाटेल की भारतीकडे सगळं काही आहे, मग ती का रडतेय? यावर स्पष्टीकरण देताना ती म्हणाली, "माझ्या घरात सगळं काही ठीक आहे. मदतीला नोकर-चाकर आहेत, कामाला माणसं आहेत, देवाने खूप सुख दिलंय... पण तरीही मला आतून खूप दडपण आल्यासारखं वाटतंय. हे नक्की काय होतंय, मलाच उमजत नाहीये."
जुनी भारती हरवल्याची भीती?
आई झाल्यानंतर आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. भारतीने कबूल केलं की, तिला तिचं जुनं आयुष्य, ते मोकळेपणाने फिरणं आणि स्वतःसाठी जगणं आता खूप आठवतंय. जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली आपली जुनी ओळख कुठेतरी हरवतेय की काय, ही भीती कदाचित तिला रडवतेय. अनेक नवीन मातांना हा अनुभव येतो, पण भारती सारख्या सेलिब्रिटीने यावर उघडपणे भाष्य केल्यामुळे या विषयावर आता चर्चा सुरू झाली आहे.
हर्षने भारतीला दिला आधार
अशा कठीण प्रसंगात जोडीदाराची साथ किती महत्त्वाची असते, हे हर्ष लिंबाचियाने दाखवून दिलंय. व्लॉगमध्ये दिसतं की, हर्ष घरात आल्यावर भारतीला रडताना पाहतो. तो तातडीने तिचे अश्रू पुसतो, तिला घट्ट मिठी मारतो आणि तिचं मन हलकं करण्यासाठी एक जोकही सुनातो. हर्षच्या या 'हसबंड गोल्स' मुळे सोशल मीडियावर त्याचं भरभरून कौतुक होत आहे.
पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजे नेमकं काय?
बाळंतपणानंतर स्त्रियांच्या शरीरात होणारे हार्मोनल बदल आणि झोपेचा अभाव यामुळे पोस्टपार्टम डिप्रेशन येऊ शकतं. ही केवळ शारीरिक समस्या नाही तर एकप्रकारे मानसिक युद्ध असतं. भारतीच्या या प्रांजळ कबुलीमुळे अनेक महिलांना दिलासा मिळाला आहे की, असं वाटणं नॉर्मल आहे आणि त्यावर उपचार किंवा संवाद आवश्यक आहे.
