शोमध्ये अमाल मलिकचा आवेझ दरबारबद्दल धक्कादायक दावा
बिग बॉस १९ च्या एका एपिसोडमध्ये अमाल मलिकने दावा केला होता की, आवेज दरबार आणि त्याची गर्लफ्रेंड नगमा मिराजकर यांना मिळालेलं यश त्याच्यामुळे आहे. अमालने सांगितलं की, त्याच्या गाण्यांमुळेच आवेज आणि नगमाला प्रसिद्धी मिळाली. हा एपिसोड रिलीज होताच आवेझचे वडील इस्माईल दरबार यांनी अमालला सणसणीत उत्तर दिलं.
advertisement
आवेझच्या वडिलांचं अमालला सणसणीत उत्तर
इस्माईल दरबार यांनी अमाल मलिकला चांगलंच सुनावलं होतं. त्यांनी एका मुलाखतीत म्हटलं, “आवेज दरबारने त्याच्या बापाचं बोट धरलेलं नाही, आणि बापानेही त्याचं बोट धरलेलं नाही. आवेज दरबारची बरोबरी करण्याची अमाल मलिकची या जन्मात लायकी नाही.”
इस्माईल दरबार पुढे म्हणाले, “अमाल मलिक म्हणतो की तो आवेजला बिझनेस देतो, पण आधी त्याने स्वतःचा बिझनेस सांभाळावा. त्याने असं काही मोठं काम केलेलं नाही की तो आवेज दरबारला काम देईल. तुमची ती औकात अजून नाहीये. उलट, तुमच्या गाण्यांना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला आवेजची मदत लागली, हे खरं आहे. त्यामुळे खोटं बोलू नका!”
अमाल मलिकच्या वडिलांनी केली मध्यस्थी
इस्माईल दरबारच्या या विधानामुळे नवीन वाद निर्माण झाला. अशातच आता अमालच्या वडिलांनी या प्रकरणी मध्यस्थी केली आहे. त्यांनी अमालच्या वक्तव्याबाबत माफी मागितली आहे. एका मुलाखतीत अमालचे वडील डब्बू मलिक यांनी या प्रकरणी अमालच्या वक्तव्यांची जबाबदारी घेतली आहे. डब्बू मलिक म्हणाले, "नक्कीच लोकांना वाईट वाटू शकतं. आवेझ आणि झैद माझी आवडती मुलं आहेत. त्यांनी अतिशय मेहनतीने त्यांचं नाव कमावलं आहे, तसंच अरमान आणि अमालने कमावलं आहे."
डब्बू मलिक यांनी अमालच्या वक्तव्यांवर मागितली मागी
ते पुढे म्हणाले, "इस्माईल यांचा मी खूप मोठा फॅन आहे. मी त्यांचा आणि त्यांच्या कामाचा खूप आदर करतो. कधी कधी गोष्टी वेगळ्या पद्धतीने अर्थ लावला जातो. त्यामुळे त्याच्या सर्व चुकांची जबाबदारी मी घेतो आणि त्याबद्दल माफी मागतो. माझ्या मुलाला माफ करावं. तुमची माफी मागायला माझी काहीही हरकत नाही. आवेझ आणि झैद ही दोन्ही मुलं कमाल आहेत आणि ते त्यांच्या स्वबळावर इथपर्यंत पोहोचली आहेत."
डब्बू मलिक असंही म्हणाले की, "खूप वैयक्तिक गोष्टी आता चर्चेत येत आहेत. असं व्हायला नको. पण कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर त्यांनी खेळ समजून ते विसरून जावं." अमाल मलिकच्या वडिलांनी त्याच्या वक्तव्यांबाबत माफी मागितली असली, तरीही आता येत्या काळात अमाल आपल्या वडिलांचा सल्ला घेत बोलण्यावर नियंत्रण ठेवणार की पुन्हा नव्या वादात अडकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.