काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते परेश रावल यांनी देवबाभळी या नाटकाचे कौतुक केले होते. इतकंच नाही, तर त्यांनी मराठी नाट्यसंस्कृती, नाटकातील विषय आणि कलाकारांच्या अभिनयाचेही मोकळेपणाने कौतुक केले होते. परेश रावल हे एकमेव असे अभिनेते नाहीत, ज्यांनी मराठी नाट्यसंस्कृतीचे कौतुक केले आहे. याआधी नसीरुद्दीन शाह, रत्ना पाठक यांसारख्या अनेक कलाकारांनी मराठी नाट्य परंपरेचे गुणगान गायले आहे. अशातच आता या यादीमध्ये बॉलिवूडचा छावा विकी कौशलच्या नावाचाही समावेश झाला आहे.
advertisement
विकी कौशललाही मराठी नाटकांची भुरळ
गेल्या काही काळापासून अनेक नाटकं प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. ‘देवबाभळी’ सारखं संगीत नाटक आणि ‘सखाराम बाईंडर’ सारखं वेगळं नाटक रंगभूमीवर येत आहे. पण, सध्या ज्या एका नाटकाची जोरदार चर्चा सुरू आहे, ते म्हणजे ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’. या नाटकाला फक्त महाराष्ट्रातच नाही, तर बॉलिवूडमधूनही कौतुक मिळत आहे. नुकतंच अभिनेता विकी कौशलनेही या नाटकाचं कौतुक केलं आहे.
या नाटकाचं खास मराठीमधून केलं कौतुक
विकी कौशलचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो मराठीतून बोलताना दिसत आहे. विकी म्हणतो, “नमस्कार, मी विकी कौशल. ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून खूप-खूप शुभेच्छा.”
विकी पुढे म्हणाला, “तुम्ही जे काम करताय, तुमची जी मेहनत आहे आणि तुमचा हा जो प्रयत्न आहे की, महाराजांचा विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचावा, ही खूप प्रेरणादायी गोष्ट आहे. तुमचे पुढचे शो हाऊसफुल्ल झाल्याशिवाय राहणार नाहीत, हीच माझी शुभेच्छा.” त्याने ‘जय भवानी, जय शिवराय’ म्हणत व्हिडिओ संपवला, ज्यामुळे सगळेच चाहते खूप खुश झाले आहेत.
समाजाचे डोळे उघडणारं नाटक!
‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ हे नाटक छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन आणि त्यांनी मानवतेसाठी केलेल्या संघर्षाबद्दल आहे. हे नाटक सांगतं की, महाराजांचा संघर्ष कोणत्याही विशिष्ट जाती किंवा धर्मासाठी नव्हता, तर तो सगळ्या कष्टकरी लोकांसाठी होता. हे नाटक काही वर्षांपूर्वीही रंगभूमीवर आलं होतं, पण काही कारणांमुळे बंद पडलं होतं. आता पुन्हा एकदा हे नाटक सुरू झालं आहे. याचे लेखक राजकुमार तांगडे आहेत, तर दिग्दर्शन कैलाश वाघमारे यांनी केलं आहे.