अभिनेत्री म्हणून अनेक वर्ष काम करत असताना माधुरी दीक्षितनं आता निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केलं आहे. माधुरी आणि तिचा नवरा डॉ. श्रीराम नेने यांची निर्मिती असलेला पंचक हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.या सिनेमाच्या निमित्तानं माधुरी आणि श्रीराम नेने अनेक ठिकाणी प्रमोशनसाठी पोहोचले आहेत. यावेळी राजश्री मराठीशी बोलताना माधुरीनं तिनं शेणानं जमीन सारवण्याचा तो किस्सा सांगितला.
advertisement
हेही वाचा - माधुरी दिक्षितच्या मराठमोळ्या नवऱ्याचं मराठी ऐकलत का? डॉ. नेनेंचा 'तो' व्हिडीओ होतोय व्हायरल
माधुरी म्हणाली, "माझी आजी, पणजी सगळे कोकणातले. आम्ही पणजी आणि आजीला भेटायला जायचो. आम्ही सगळी भावंड उन्हाळ्याच्या सुट्टीत जायचो, आंबे खायचो. झाडावर चढायचो. म्हशी होत्या. आमचे आजोबा खूप शिस्तीची होते. आम्ही लहान मुलं आमच्या घरातील एका मोठ्या झोक्यावर बसायचो. आजोबांचा आवाज ऐकला की आम्ही सगळे तिथून पळून जायचो. कारण आजोबा आले की सगळ्यांना कामाला लावायचे. म्हणायचे, काय झोके घेताय काम करा. मला बोलावायचे आणि सांगायचे हे शेण घे आणि तिथे सारवायला बस. मग आजोबा आमच्याकडून शेण सारवून घ्यायचे."
माधुरी पुढे म्हणाली, "पाणी शिंपडणं, म्हशींना आंबवण देणं हे सगळं आम्ही करायचो. आम्ही आजोबांना खूप घाबरायचो. ते आले की आम्ही घरात पळायचो. जुन्या घरांमध्ये खूप दार असायची. मग या दारातून त्या दारात आम्ही पळायचो."
नवीन वर्षात रिलीज होणारा हा पंचक हा मल्टीस्टारर सिनेमा आहे. अभिनेता आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दिप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.