केरळचा अभिनेता स्वतःला मानतो महाराष्ट्राचा मुलगा
हा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ मेनन. सिद्धार्थ मेनन हे नाव मराठी इंडस्ट्रीसाठी काही नवीन नाही. त्याने ‘एकुलती एक’, ‘पोश्टर गर्ल’, ‘पोपट’, ‘जून’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का, तो मूळचा केरळचा आहे! एका पत्रकार परिषदेत त्याने स्वतः हा खुलासा केला.
advertisement
सिद्धार्थला विचारण्यात आलं की, मल्याळम चित्रपट सध्या खूप चर्चेत आहेत, तरीही तो मराठी चित्रपटांमध्ये का काम करतो? त्यावर त्याने खूपच प्रामाणिक उत्तर दिलं. तो म्हणाला, “मला असं वाटतं की, मी केरळचा असा एकमेव अभिनेता असेन, ज्याने अजूनपर्यंत मल्याळम चित्रपटात काम केलेलं नाहीये. पण, मला याबद्दल काहीच वाईट वाटत नाहीये.”
‘मराठी दिग्दर्शकाने मला वाचवलं!’
सिद्धार्थ पुढे म्हणाला, “मला वाटतं, प्रत्येकवेळी मराठी दिग्दर्शकांनी माझ्या करिअरला वाचवलं आहे, मला पाठिंबा दिला आहे. मी केरळचा असलो, तरी मी महाराष्ट्राचा मुलगा आहे. त्यातही मी पुण्याचा आहे, मी मराठीच आहे. लहानपणापासून मी इतके मराठी चित्रपट पाहिले आहेत, त्याचं श्रेय माझ्या आई-वडिलांना जातं.”
तो म्हणाला, “माझा पहिला सिनेमा हिंदी होता. त्यानंतर मी मराठीत काम करायला सुरुवात केली. मराठी सिनेविश्वात खूप ताकद आहे, आपले सगळेच कलाकार खूप दिग्गज, मेहनती आणि सतत काहीतरी नवीन करू पाहणारे आहेत. अनेकदा मला लोक बोलतात, आता नको मराठी सिनेमा करायला…पण, मी त्यांना वेळोवेळी गप्प केलं आहे. मी हे अभिमानाने सांगेन की, मी कायम त्यांना सांगितलंय. हा आपला सिनेमा आहे, आपण यासाठी मेहनत केली पाहिजे. आपणच आपल्या सिनेमाला पुढे नेलं पाहिजे.”