पुरुषोत्तम साखरे हे छत्रपती संभाजीनगरातील सिनर्जी हॉस्पिटल समोरील शनि चौकात 'द्वारकाधीश ढोकळा सेंटर' हे दुकान चालवतात. यापूर्वी ते वाहन चालक होते. कोरोना काळात त्यांनी सिक्युरिटीचं काम देखील केलं. नंतर, त्यांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे त्यांना जोखमीची कामं करणे, अशक्य झालं. मात्र, त्यांनी हार मानली नाही. आपल्याला शक्य होईल ते प्रयत्न करायचे आणि काहीतरी व्यवसाय सुरू करायचा, असा चंग त्यांनी बांधला. मित्रांनी सुचवलेल्या कल्पनेतून साखरे यांनी ढोकळा सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
साखरे यांनी साधारण 1 वर्षांपूर्वी ढोकळा सेंटर सुरू केलं. ढोकळा विक्रीचा व्यवसाय सुरू केल्यानंतर सुरुवातीच्या काळात 100 पीस असलेला एक ढोकळ्याचा ट्रे ते विक्रीसाठी आणत होते. हळूहळू त्यांना चांगला प्रतिसाद मिळाल्याने विक्री वाढली. सध्या ते 300 ढोकळा पीसची विक्री करतात. त्यांच्याकडील ढोकळा हा पूर्णपणे घरगुती पद्धतीने बनवलेला असतो. त्यांची मुलगी ढोकळा बनवून देण्याचं काम करते तर पुरुषोत्तम सारखे हे विविध प्रकारच्या चटणी बनवतात.
साखरे यांच्याकडील ढोकळा चविष्ट आणि हायजेनिक असल्याने त्यांच्याकडे खवय्यांची नेहमीच गर्दी होते. त्यांच्यासोबत पत्नी मीना साखरे यादेखील खांद्याला खांदा लावून ढोकळा आणि अप्पे विक्री करतात. या व्यवसायाच्या माध्यमातून ते दररोज सुमारे 3000 तर महिन्याला 70 ते 80 हजार रुपयांची उलाढाल करतात. अशी माहिती पुरुषोत्तम साखरे यांनी लोकल 18शी बोलताना दिली.