विक्रम भट्ट आणि त्यांची मुलगी कृष्णा भट्ट यांच्यावर मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात 13.5 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. वृत्तानुसार विक्रम भट्ट आणि त्यांच्या मुलीने एका व्यावसायिकाला चित्रपटांमध्ये गुंतवणूक करण्याच्या बदल्यात मोठ्या नफ्याचे आमिष दाखवलं. या आश्वासनाच्या आधारे व्यावसायिकाने त्यांना 13.5 कोटी रुपये दिले, पण त्यांना परतावे मिळाले नाहीत आणि मूळ रक्कमही परत मिळाली नाही, असा आरोप आहे. बराच काळ परतफेड न केल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
advertisement
या तक्रारीच्या आधारे, आर्थिक गुन्हे शाखेने वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे आणि तपास हाती घेतला आहे. तपास संस्था व्यवहार आणि गुंतवणुकीशी संबंधित सर्व कागदपत्रांची तपासणी करत आहे.
विक्रम भट्ट आणि त्याची पत्नी श्वेतांबरी भट्ट आधीच 30 कोटी रुपयांच्या एका फसवणुकीच्या प्रकरणात उदयपूर तुरुंगात आहेत. डिसेंबरच्या सुरुवातीला त्यांना अटक करण्यात आली होती, त्यानंतर सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आणि नंतर तुरुंगात रवानगी झाली. प्रकृती ठिक नसल्याचं कारण देत भट्ट दाम्पत्याने उदयपूर न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला, पण 17 डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्यांना जामीन नाकारला. हे जोडपं आता जोधपूर उच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान देण्याची तयारी करत आहे.
इंदिरा ग्रुप ऑफ कंपनीचे संस्थापक डॉ. अजय मुरडिया यांनी भट्ट यांच्याविरोधात तक्ररा केली होती. डॉ. मुरडिया देशभरात इंदिरा आयव्हीएफ सेंटर चालवतात. असं म्हटलं जातं की ते मुंबईत विक्रम भट्ट यांना भेटले, जिथे त्यांनी त्यांच्या पत्नी इंदिरा यांच्यावर बायोपिक बनवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर बायोपिकसह चार चित्रपटांच्या निर्मितीसाठी करार करण्यात आले आणि एकूण 44.29 कोटी रुपयांचं पेमेंट करण्यात आलं.
चार चित्रपटांपैकी काही चित्रपटांचे चित्रीकरण झालं होतं, तर काही चित्रपट सुरूच झाले नव्हते असा आरोप आहे. जेव्हा त्या व्यावसायिकाने त्याचे पैसे परत मागितले तेव्हा त्याला वारंवार नकार देण्यात आला, ज्यामुळे त्याने पोलीस तक्रार दाखल केली. आता, खटल्यांच्या ओघात विक्रम भट्ट यांच्या कायदेशीर अडचणी आणखी वाढल्या आहेत़
