नृत्यांगना ते आक्रमक नेत्या: दीपाली यांचा प्रवास
दीपाली सय्यद म्हणजे एक असं व्यक्तिमत्व, ज्यांच्या शब्दांत धार आणि डान्समध्ये आग आहे. १ एप्रिल १९७८ रोजी बिहारमध्ये जन्मलेल्या दीपाली यांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं असलं, तरी त्यांचं मन मात्र कलेत रमलं. नालंदा विद्यापीठातून 'फाईन आर्ट्स'ची पदवी घेणाऱ्या दीपाली यांनी १९९० च्या दशकात 'बंदिनी' आणि 'समांतर' या मालिकांतून अभिनयाचा श्रीगणेशा केला. मात्र, खऱ्या अर्थाने त्या गाजल्या त्या त्यांच्या ठसकेबाज लावणी आणि डान्स नंबर्समुळे.
advertisement
राजकीय आखाड्यातून 'बिग बॉस'च्या कैदेत
दीपाली केवळ अभिनयापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत. त्यांनी समाजकारण आणि राजकारणातही नशिब आजमावलं. २०१४ मध्ये अहमदनगरमधून 'आप'च्या तिकिटावर, तर २०१९ मध्ये मुंब्रा-कळवा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी निवडणूक लढवली. निवडणुकांच्या मैदानात त्यांना यश मिळालं नसलं, तरी त्यांची 'रोखठोक' विधानं नेहमीच चर्चेचा विषय ठरली. आता त्याच 'आक्रमक' बाण्याची प्रचिती बिग बॉसच्या घरात येणार आहे.
घरात 'राडा' होणार हे नक्की!
बिग बॉसचं घर म्हणजे संयमाची परीक्षा. दीपाली सय्यद या त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात. समोर कोणीही असो, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यात त्या मागे-पुढे पाहत नाहीत. अशातच, रितेश देशमुख यांनी दिपालीला शॉर्टकट दार किंवा मेहनत दार यापैकी एकाची निवड करायला सांगितली. यानंतर दिपालीने शॉर्टकट दाराची निवड करत घरात प्रवेश केला आहे. आता घरातील इतर स्पर्धकांशी त्यांची जुगलबंदी कशी रंगते, हे पाहणं रंजक ठरेल. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांनी आधीच 'राडा होणार' अशा कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
नव्या घरात नवी खेळी
यंदाचं घर ८०० खिडक्या आणि ९०० दारांनी सजलं असून, रितेश देशमुख यांच्या 'भाऊचा धक्का' यंदा कोणाला बसणार? यात दीपाली आपली जागा कशी बनवतात, हे महत्त्वाचं ठरेल. एका बाजूला त्यांचा ग्लॅमरस अंदाज आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा राजकीय अनुभव, हे समीकरण त्यांना विजयापर्यंत नेणार का?
