महिला व बालविकास मंत्री आदिती सुनील तटकरे यांच्या हस्ते 'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम' या सिनेमाचा मुहूर्त पार पडला. यावेळी दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि निर्माती क्षिती जोग उपस्थित होते. यावेळी आदिती तटकरे म्हणाल्या, "आपल्या प्रत्येकाच्या जडणघडणीत शाळेचे मोठे योगदान असते. मातृभाषेतून होणारे शिक्षण विद्यार्थ्यांच्या संस्कारांवर खोलवर परिणाम करणारे आहे. ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ या चित्रपटातून समाजाला योग्य संदेश मिळेल आणि तो विचार करायला लावणारा ठरेल. रायगड जिल्ह्यात या चित्रपटाचा मुहूर्त होत असल्याचा मला विशेष अभिमान आहे. दिग्दर्शक हेमंत ढोमे व निर्मात्या क्षिती जोग नेहमीच समाजाला आरसा दाखवणारे आशयसंपन्न चित्रपट सादर करत असतात. त्यांचा हा नवीन चित्रपटही नक्कीच मनाला स्पर्श करणारा ठरेल."
advertisement
( 'हे टाका सगळीकडे, कळूदे सगळ्यांना'; प्रियाने सगळ्यांसमोर आणला न पाहिलेला उमेश कामत, VIDEO )
दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाला, "आज मी जे काही आहे, ते माझ्या मराठी शाळांमुळेच आहे. मातृभाषेतून शिकताना मला माझी संस्कृती, परंपरा आणि माणसं समजली. पण आज मराठी शाळा कमी होत चालल्या आहेत ही चिंतेची बाब आहे. या चित्रपटातून मातृभाषेतून होणारे शिक्षण कमीपणाचं नसून खऱ्या अर्थाने समृद्ध करणारं आहे, हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न असेल. मुहूर्ताला मा. आदिती तटकरे यांसारख्या समाजभान असलेल्या लोकप्रतिनिधींचा पाठिंबा मिळणे ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे."
नेहमीप्रमाणे क्षिती जोगनं या सिनेमाची निर्मिती केली आहे. चलचित्र मंडळी निर्मित या सिनेमाचं लेखन व दिग्दर्शन हेमंत ढोमेनं केलं आहे. या सिनेमात नेमके कोण कोण कलाकार झळकणार आहेत याबाबत मात्र अद्याप कुठलाही खुलासा करण्यात आलेला नाही. 'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम' या सिनेमाचं शूटींग कोकणातील अलिबाग येथे सुरू आहे.
