खऱ्या आयुष्यातील 'हिरोईन'
चित्रपटांमध्ये अभिनेत्री पोलीस पात्रासाठी विशेष प्रशिक्षण घेतात, त्या ठिकाणी अभिनेत्री सिमाला प्रसाद खऱ्या आयुष्यात प्रत्यक्षातच एक SP आहेत. त्या सध्या मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात नियुक्त आहेत. वर्दी परिधान करून गुन्हेगारांशी सामना करणाऱ्या सिमालांनी 2016 मध्ये ‘अलिफ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यांच्या अभिनयाचं त्या वेळी भरपूर कौतुक झालं. यानंतर त्या 2019 मध्ये ‘नक्काश’ या चित्रपटात झळकल्या. या चित्रपटात त्यांनी कुमुद मिश्रा, शारिब हाशमी आणि राजेश शर्मा यांसारख्या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केली. त्यांच्या स्क्रीनवरच्या उपस्थितीत एक वेगळंच गांभीर्य आणि साधेपणा आहे. त्यामुळे त्या इतर कलाकारांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या ठरतात.
advertisement
'पुन्हा शिवाजीराजे...' वादावर मांजरेकरांनी मौन सोडलं, 'कोणाच्याही आडकाठीशिवाय, कुठल्याही भीतीशिवाय...'
‘द नर्मदा स्टोरी’मध्ये दिसणार
सिमाला लवकरच ‘द नर्मदा स्टोरी’ या नव्या चित्रपटात झळकणार आहेत. ही एक सत्य घटनांवर आधारित पोलिस थ्रिलर फिल्म आहे, ज्यात त्या एका जबरदस्त तपास अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत रघुबीर यादव, मुकेश तिवारी आणि अंजली पाटील हे प्रसिद्ध कलाकारही दिसणार आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन झैगम इमाम यांनी केलं आहे, जे ‘अलिफ’ आणि ‘नक्काश’चेही दिग्दर्शक होते. विशेष म्हणजे, चित्रपटाची शूटिंग संपूर्ण मध्य प्रदेशात झाली असून, पोलिसांच्या वास्तव अनुभवांना सिनेमात उतरवण्यात आलं आहे.
प्रशासकीय सेवेतून सिनेमापर्यंतचा प्रवास
सिमाला प्रसाद यांचा जन्म भोपाळमध्ये एका प्रतिष्ठित कुटुंबात झाला. त्यांचे वडील डॉ. भागीरथ प्रसाद हे 1975 च्या IAS बॅचचे अधिकारी असून, एकेकाळी खासदारही राहिले आहेत. ते दोन विद्यापीठांचे कुलगुरू सुद्धा राहिले. त्यांची आई, मेहरुन्निसा परवेज, एक प्रसिद्ध साहित्यिका आहेत, ज्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं आहे. सिमालांनी आपल्या प्रशासकीय कारकिर्दीची सुरुवात MPPSC उत्तीर्ण होऊन डीएसपी पदावरून केली. मात्र त्यांची ध्येय जास्त मोठी होती. त्यांनी कोणतीही शिकवणी न घेता, 2010 मध्ये पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि ऑल इंडिया रँक 51 मिळवत IPS अधिकारी बनल्या.
कला आणि प्रशासन यांचा सुंदर संगम
सिमाला केवळ वर्दीत किंवा कॅमेऱ्यासमोरच नव्हे, तर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही सक्रिय असतात. त्या सरकारी कार्यक्रमांमध्ये नृत्य व अभिनयाच्या माध्यमातून स्वतःची कला सादर करतात. त्यांचं मत आहे "एखाद्या व्यक्तीने स्वतःला एका ओळखीपुरतं मर्यादित करू नये. जीवनातील प्रत्येक पैलू जगायला हवा."