आपण बोलतोय ती म्हणजे अष्टपैलू अभिनेत्री कल्कि कोचलिन हिच्याबद्दल. पुडुचेरीच्या एका छोट्याशा गावात जन्मलेल्या या फ्रेंच कन्येने बॉलिवूडमध्ये स्वतःचे एक वेगळे स्थान कसे निर्माण केलं हा प्रश्न अनेकांना आहेच.
कल्किचे आई-वडील फ्रेंच असले तरी तिचे मूळ आणि संस्कृती भारतीय आहे. अभिनयाची ओढ तिला लंडनपर्यंत घेऊन गेली, जिथे तिने थिएटरचे धडे गिरवले. तिची ही मेहनत 'मार्गरिटा विथ अ स्ट्रॉ' सारख्या चित्रपटांमधून जगासमोर आली, जिथे तिने साकारलेल्या डिप भूमिकेने प्रेक्षकांना थक्क केले.
advertisement
कल्किच्या करिअरला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली ती 'देव डी' या चित्रपटामुळे. विशेष म्हणजे, दिग्दर्शक अनुराग कश्यप सुरुवातीला तिला या भूमिकेसाठी घेण्यास तयार नव्हते. पण कल्किच्या जिद्दीने त्यांना विचार करायला भाग पाडले. या चित्रपटाने तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला आणि इथूनच तिच्या आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरू झाला. याच दरम्यान तिचे आणि अनुरागचे सूत जुळले, त्यांनी लग्न केले, परंतु काही वर्षांनी ते एकमेकांपासून वेगळे झाले.
कल्कि कोचलिन नेहमीच तिच्या बेधडक विचारांसाठी ओळखली जाते. समाजाने ठरवून दिलेल्या लग्नाच्या बंधनात न अडकता तिने आपल्या मुलीचे, साफोचे स्वागत केले. तिचा बॉयफ्रेंड गाय हर्षबर्ग याच्यासोबत ती विनालग्न राहून आपल्या मुलीचा सांभाळ करत आहे. एक 'सिंगल मदर' म्हणून तिची ही वाटचाल अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
कल्किने केवळ गंभीर सिनेमे केले नाहीत, तर 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' मधील पजेसिव्ह मंगेतर 'नताशा' असो किंवा 'ये जवानी है दीवानी' मधील प्रेक्षकांची लाडकी 'अदिती', तिने प्रत्येक व्यक्तिरेखा जिवंत केली. सध्या ती 'भय - द गौरव तिवारी मिस्ट्री' या ओटीटी सिरीजमुळे चर्चेत आहे, जी प्रसिद्ध पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर गौरव तिवारी यांच्या जीवनावर आधारित आहे.
मानिसक आरोग्य आणि महिलांच्या हक्कांवर परखड भाष्य करणारी कल्कि खऱ्या अर्थाने एक 'रिअल लाईफ' हिरोईन आहे. तिचे आयुष्य आपल्याला शिकवते की, परिस्थिती कशीही असो, स्वतःच्या तत्त्वावर जगण्यातच खरा आनंद असतो.
