कुंजिकाने ही बातमी लगेच नाही, तर बाळ झाल्याच्या बरोब्बर एका महिन्यानंतर चाहत्यांसमोर आणली आहे. आपल्या बाळाचा चिमुकला हात हातात घेतलेला एक सुरेख फोटो पोस्ट करत तिने लिहिलंय, "नेमक्या एका महिन्यापूर्वी आमचं आयुष्य पूर्णपणे बदललं. आम्ही आमच्या गोंडस मुलाचं जगात स्वागत केलं. गेले चार आठवडे रात्रीची झोप उडाली असली, तरी मुलाची ती मिठी आणि त्याच्याबद्दलचं प्रेम जगातील इतर कोणत्याही सुखापेक्षा मोठं आहे. पालकत्व हे जादूई आणि तितकंच आव्हानात्मक आहे. आम्ही शिकतोय, पुढे जातोय आणि आमच्या मुलाच्या आणखीन प्रेमात पडतोय. आयुष्यातील या नव्या अध्यायासाठी आम्ही खूप आभारी आहोत." कुंजिकाच्या या पोस्टनंतर मराठी कलाविश्वातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
advertisement
कतरिना कैफ आणि विकी कौशलशी खास कनेक्शन
कुंजिकाने शेअर केलेल्या या फोटोने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे, कारण हा फोटो अगदी बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ हिच्यासारखाच आहे. काही दिवसांपूर्वीच कतरिना आणि विकी कौशल यांना मुलगा झाला आणि त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव 'विहान' असं ठेवलं. कतरिनाने देखील आपल्या बाळाचा छोटासा हात हातात घेतलेला फोटो शेअर केला होता. कुंजिकाने हीच पोज वापरून आपल्या बाळाचा फोटो टिपला आहे, जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
डोहाळ जेवणाचे फोटो झाले होते व्हायरल
काही महिन्यांपूर्वीच कुंजिकाच्या डोहाळजेवणाचा कार्यक्रम अगदी थाटामाटात पार पडला होता. पारंपरिक हिरव्या रंगाची साडी, फुलांचे दागिने आणि कुंजिकाच्या चेहऱ्यावरचा तो प्रेग्नन्सी ग्लो पाहून चाहते घायाळ झाले होते. पती निखिल काळविंट सोबतचे तिचे ते रोमँटिक आणि आनंदाचे क्षण सोशल मीडियावर खूप गाजले होते. तेव्हापासूनच तिचे चाहते ही गोड बातमी कधी मिळते, याची आतुरतेने वाट पाहत होते.
'शुभविवाह' मधून घरोघरी पोहोचली
कुंजिकाने 'शुभविवाह' मालिकेत साकारलेली पौर्णिमाची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. तिच्या अभिनयामुळे तिने घराघरांत आपली ओळख निर्माण केली आहे. आता खऱ्या आयुष्यात 'आई'ची भूमिका साकारण्यासाठी ती सज्ज झाली असून, तिच्या या नवीन प्रवासासाठी सर्वजण तिला शुभेच्छा देत आहेत.
