या पुरस्कार सोहळ्यात मराठीतील गुणी अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना चित्रपती कै. व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मुक्ता बरोबर तिची आई देखील उपस्थित होती. मुक्ताला इतका मोठा पुरस्कार घेताना पाहून तिच्या आईला अश्रू अनावर झाले. मुक्ताच्या आतापर्यंच्या करिअरमध्ये तिच्या आईचा तिला खूप मोठा सपोर्ट आहे. लेकीचं यश पाहून आईलाही आपले आनंदाश्रू थांबवता आले नाहीत.
advertisement
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुक्ताला चित्रपती कै. व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर मुक्तानं तिचं मनोगत व्यक्त केलं. ती म्हणाली, "रंगमंचावरून सगळे माननीय माझे सीनिअर्स, माझे प्रेक्षक, मला संधी देणारे लेखक, दिग्दर्शक, सहकलाकार, काही वरना माझ्याकडे कौतुकानं बघतायत. मला केवळ कृतज्ञता एवढाच शब्द आता सुचतोय."
मुक्ता पुढे म्हणाली, "चकवा या चित्रपटाचा उल्लेख झाला. शासनाने कायमच माझं खूप मनापासून कौतुक केलेलं आहे. पदार्पणात चकवा या चित्रपटासाठी मला पुरस्कार मिळाला आणि आज विशेष योगदान पुरस्कार मिळतोय त्याचा मला खरंच मनापासून आनंद होतोय. कृतज्ञ वाटतंय. हा पुरस्कार म्हणजे मराठी पद्धतीने सांगणं की, आतापर्यंत बरी वागली आहेस आता यापुढे आणखी अपेक्षा आहेत. तुमच्या माझ्याकडून या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा मी मनापासून प्रयत्न करेन. माझी इतक्या मोठ्या पुरस्कारासाठी निवड केली त्याबद्दल मनापासून आभार."
शेवटी बोलताना मुक्ताने तिच्या आईचा उल्लेख केला. ती म्हणाली, "माझी आई आली आहे तिला खूप आनंद झालाय. ती रडत असेल मला खात्री आहे." मुक्ताची आई तिच्यासाठी आनंदानं टाळ्या वाजवत होती. लेकीला पुरस्कार घेताना पाहून त्या भावुक झाल्या. मायलेकीचा हा हळवा क्षण कॅमेरात कैद झाला. मुक्ताला पुरस्कार मिळाल्यानंतर तिच्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षात होतोय.