"निगरगट्ट आणि कोडगा निर्माता!" शशांकचा थेट हल्ला
शशांकने फेसबुकवर आपली व्यथा मांडताना स्पष्ट केलं की, एका निर्मात्यासोबतचं त्याचं हे पेमेंटचं प्रकरण गेल्या ५ वर्षांपासून रखडलेलं आहे. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी पुन्हा संवाद सुरू होऊनही त्या निर्मात्याने दिलेला एकही शब्द पाळलेला नाही. शशांकने अतिशय कडक शब्दांत लिहिलंय, "5 वर्ष होऊन गेली. मागची ५ वर्ष आणि ८ october २०२५ पासून पुन्हा contact establish झाल्या मुळे तेव्हा पासून दिलेली एकही तारीख त्या निर्मात्याने पाळलेली नाही. थोडक्यात काय निगरगट्ट, कोडग्या निर्मात्याच्या थापांचा कंटाळा आलाय आता. अजून एक date दिली आहे त्याने उद्याची ( ५ जानेवारी २०२६ ) full payment जमा झाले नाही तर एक detailed video post करेन… सगळ्या कुंडली सकट. आणि payment झाले तर.. तसाही payment झाल्याचा video पण post करेन."
advertisement
आस्ताद काळेची शशांक केतकरला साथ
शशांकच्या या पोस्टवर अभिनेता आस्ताद काळे यानेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. आस्ताद म्हणाला, "हे एका प्रामाणिक आणि अतिशय लोकप्रिय कलाकाराचं दुखणं आहे... एका चांगल्या माणसाला होणारा हा विनाकारण त्रास आहे." आस्तादच्या या कमेंटमुळे इंडस्ट्रीतल्या निर्मात्यांच्या मनमानी कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
ग्लॅमरच्या पडद्यामागचं दाहक वास्तव
शशांक केतकर सध्या 'मुरांबा' मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय. 'होणार सून मी ह्या घरची' पासून सुरू झालेला त्याचा प्रवास आजही तितक्याच दिमाखात सुरू आहे. मात्र, इतका मोठा चाहता वर्ग आणि लोकप्रियता असूनही कलाकारांना आपल्या हक्काच्या मानधनासाठी निर्मात्यांच्या उंबरठ्यावर नाक घासावं लागतं, हे वास्तव थक्क करणारं आहे. पडद्यावरचं ग्लॅमरस आयुष्य जगणाऱ्या कलाकारांना शूटिंगचे तास, तारखांचा घोळ आणि अखेर पैशांसाठी होणारी ही मानसिक ओढाताण किती भयानक असते, हे शशांकच्या या संतापावरून स्पष्ट दिसतंय.
सर्वांचं लक्ष शशांकच्या व्हिडिओकडे
शशांकने उद्याची म्हणजेच ५ जानेवारीची डेडलाईन दिली आहे. जर पैसे मिळाले, तर शशांक आनंदाची बातमी देईल. जर पैसे नाही मिळाले, तर तो त्या निर्मात्याचं नाव आणि त्याने केलेला छळ जगासमोर आणेल. मराठी सिनेसृष्टीतील इतर कलाकारही आता शशांकच्या समर्थनासाठी उभे ठाकले आहेत. आता ५ तारखेला त्या निर्मात्याचं नशीब उजळतं की शशांक त्याचं पितळ उघडं पाडतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
