थिएटरपासून बिग बॉसच्या घरापर्यंतचा प्रवास
करण सोनवणे हा प्रवास काही एका रात्रीत झालेला नाही. २०१४-१५ च्या सुमारास जेव्हा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सिंगचं वारं नुकतंच वाहू लागलं होतं, तेव्हा एका सामान्य मराठी मुलाने थिएटर आणि स्टँड-अप कॉमेडीच्या माध्यमातून लोकांच्या मनात जागा मिळवायला सुरुवात केली. मध्यमवर्गीय मराठी माणसाच्या आयुष्यातील छोटी-छोटी सुखं आणि विसंगती अतिशय खुमासदार पद्धतीने मांडण्यात करणचा हातखंडा आहे. आज सोशल मीडियावर त्याचा १.५ मिलियनहून अधिक चाहत्यांचा ताफा आहे, जो त्याला 'फोकस्ड इंडियन' या नावानेच ओळखतो.
advertisement
बिग बॉसच्या घरात जाणाऱ्या आपल्या मित्राला निरोप देण्यासाठी त्याची संपूर्ण ऑरेंज ज्यूस मंडळी हजर होती. त्यावेळी सर्वांनी त्याला शुभेच्छा दिल्या आणि त्याच्यासाठी फॅन्सची पुर्ण ताकद लावणार असल्याचंही सांगितलं. करणसोबत आणखी एका सोशल मिडिया स्टारची एन्ट्री झाली आहे, तो म्हणजे प्रभु शेळके. यावेळी दोघांनाही दार निवडण्याची संधी दिली. यानंतर प्रभुने मेहनतीचं दार निवडलं, तर करणने शॉर्टकटचं दार निवडलं. यामुळे करणकडे स्पेशल पॉवर असणार आहेत.
दरम्यान, केवळ रिल्स किंवा व्हिडिओंपुरता करण मर्यादित राहिलेला नाही. त्याने अभिनयाच्या क्षेत्रातही आपली मोहोर उमटवली आहे. 'ब्लॅकआउट', '१२३४', 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' यांसारख्या प्रोजेक्ट्समधील त्याच्या कामाचं कौतुक झालंय. आता त्याने 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री घेऊन मास्टरस्ट्रोक खेळला आहे.
घरात काय राडा होणार?
बिग बॉसचं घर हे केवळ हसण्या-खिदळण्याचं ठिकाण नाही; तिथे संयम, राजकारण आणि टास्कचा कस लागतो. रिल्समध्ये सर्वांना आपल्या तालावर नाचवणारा करण, रितेश भाऊंच्या धक्क्यावर कसा तग धरतो आणि घरातील इतर स्पर्धकांसोबत त्याचा गेम कसा राहतो, हे पाहणं खरोखरच रंजक ठरेल. त्याच्या विनोदी शैलीमुळे घरातील वातावरण हलकं-फुलकं राहील की त्याचे हेच विनोद इतरांच्या डोक्याला ताप ठरतील? यावरच त्याचं या घरातील भवितव्य अवलंबून आहे.
