'फुलवंती'ला एक वर्ष पूर्ण
११ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या 'फुलवंती' चित्रपटाला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. या निमित्ताने प्राजक्ताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत, या भूमिकेबद्दल तिची कृतज्ञता व्यक्त केली आहे. प्राजक्ताने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, "यंदाचे जवळपास सर्व पुरस्कार जिनं मिळवून दिले, त्या 'फुलवंती'च्या प्रदर्शनाला आज १ वर्ष पूर्ण झालं... देवाचे आभार की तू माझ्या आयुष्यात आलीस..." तिच्या या भावनांनी भरलेल्या शब्दांनी चाहत्यांनाही भावूक केले आहे.
advertisement
निर्माती म्हणून यशस्वी पदार्पण
'फुलवंती' हा चित्रपट प्राजक्तासाठी अनेक अर्थांनी खास आहे. कारण या चित्रपटातून तिने केवळ मुख्य भूमिकाच साकारली नाही, तर निर्मिती क्षेत्रातही यशस्वी पदार्पण केले. चित्रपटाचे दिग्दर्शन स्नेहल तरडे यांनी केले होते. या चित्रपटात प्राजक्तासोबत गश्मीर महाजनी, क्षितिश दाते, सुखदा खांडकेकर, दीप्ती लेले यांसारख्या कलाकारांनीही दमदार काम केले होते. चित्रपटाची कथा, भावनांचा सखोलपणा आणि कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला.
'मदनमंजिरी'ची जादू
'फुलवंती' प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांनी याला मोठा प्रतिसाद दिला. चित्रपटातील गाणीही प्रचंड लोकप्रिय झाली, विशेषतः 'मदनमंजिरी' ही लावणी तुफान हिट ठरली. या गाण्यावर अनेक चाहत्यांनी हुक स्टेप करून सोशल मीडियावर रील्स बनवले, ज्यामुळे चित्रपटाची लोकप्रियता अधिक वाढली.
प्राजक्ताने आपल्या पोस्टमध्ये 'सौंदर्य आणि कलेची अनभिषिक्त सम्राज्ञी फुलवंती' आणि 'विद्याविभूषित प्रकांडपंडित शास्त्रीबुवा' यांच्यातील संघर्षाला एक वर्ष पूर्ण झाल्याचे नमूद केले आहे. तिच्या चाहत्यांनी या पोस्टवर भरभरून प्रेम व्यक्त करत, तिच्या कामाचे कौतुक केले आहे. हा चित्रपट सध्या प्राइम व्हिडीओ आणि ZEE5 वर उपलब्ध आहे.