ती काळी रात्र आणि भयंकर अपघात
गोष्ट आहे ३० नोव्हेंबर २०१० ची. सांताक्रूझचा परिसर रात्रीच्या शांततेत असताना अचानक टायर घासल्याचा आणि जोरात धडक झाल्याचा आवाज आला. त्या रात्री प्राजक्ता शुक्रे आणि अभिजीत सावंत आपल्या मित्रांसह वेगवेगळ्या गाड्यांमधून जात होते. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, या सेलिब्रिटींच्या गाड्यांमध्ये जणू शर्यत लागली होती. प्राजक्ता स्वतः गाडी चालवत होती आणि तिचा वेग ताशी १०० किमीच्या पुढे होता.
advertisement
वेगाच्या याच नशेत प्राजक्ताचं नियंत्रण सुटलं आणि तिची कार थेट एका दुचाकीला जाऊन धडकली. या अपघातात तोहील खान आणि तौफिक खान हे दोन तरुण गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले. या भीषण अपघाताने परिसरात एकाच खळबळ उडाली.
अभिजीत सावंतला खावा लागलेला लोकांचा मार
अपघात झाल्यावर अभिजीत सावंत मदतीसाठी धावला, पण तिथेच सगळं गणित बिघडलं. जखमी मुलांना पाहून स्थानिक लोक प्रचंड संतापले होते. अभिजीतने त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, पण त्याने वापरलेली भाषा लोकांना खटकली. "माझे खूप कॉन्टॅक्ट्स आहेत, मी पैशांची सोय करतो," असं अभिजीतने म्हणताच जमावाचा संयम सुटला.
लोकांना वाटलं की हा सेलिब्रिटी पैशांच्या जोरावर गरिबांच्या जीवाशी खेळू पाहतोय. मग काय? लोकांनी थेट अभिजीतलाच लक्ष्य केलं आणि भररस्त्यात 'इंडियन आयडॉल'च्या पहिल्या विजेत्याला बेदम चोप दिला. मैत्री निभावण्याच्या नादात अभिजीतला त्या रात्री शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही जखमा सोसाव्या लागल्या.
प्राजक्ताला अटक आणि ३ हजारांचा जामीन
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून सांताक्रूझ पोलिसांनी तातडीने धाव घेतली. जमावाच्या तावडीतून अभिजीत आणि प्राजक्ताची सुटका करून त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. प्राजक्ता शुक्रेवर रॅश ड्रायव्हिंगचा गुन्हा दाखल झाला. मात्र, दुसऱ्याच दिवशी अवघ्या ३,००० रुपयांच्या जामिनावर तिची सुटका झाली. पण या एका घटनेने अभिजीत सावंतची प्रतिमा लोकांच्या नजरेत काही काळासाठी धुळीला मिळवली होती.
बिग बॉसच्या घरात आता काय होणार?
अभिजीत सावंतने 'बिग बॉस मराठी ५' मध्ये आपल्या संयमी वागण्याने प्रेक्षकांची मनं पुन्हा जिंकली. आता त्याच अभिजीतची जुनी मैत्रीण प्राजक्ता शुक्रे 'सीझन ६' मध्ये आली आहे. जुन्या चुकांची ओझी आणि ती वादग्रस्त पार्श्वभूमी घेऊन प्राजक्ता या घरात कशी टिकते? हे पाहणं रंजक ठरेल.
