एक फोन आणि बदलले प्रकाश झा यांचे आयुष्य
दररोज कुठेतरी एखादे बाळ कचरापेटीत किंवा ओसाड जागेत टाकल्याच्या बातम्या समोर येतात. अशीच एक हृदयद्रावक घटना प्रकाश झा यांच्यासमोर आली आणि त्यांच्या आयुष्य पूर्णपणे बदललं. 2015 मध्ये ‘पॅरेंट सर्कल’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी 1988 मधील एका घटनेचा उल्लेख केला होता. प्रकाश झा हे दिल्लीतील एका अनाथालयात स्वयंसेवक म्हणून काम करत होते. त्याचदरम्यान अनाथालयातून एक फोन आला की 10 दिवसांची एक मुलगी थिएटरच्या सीटखाली सोडून गेली आहे. प्रकाश झा यांनी जेव्हा तिला पाहिले तेव्हा त्यांचे हृदय पिळवटून गेले. कारण उंदरांनी त्या बाळाचे शरीर कुरतडले होते.
advertisement
उंदीर आणि कीटकांनी केलेल्या जखमांमुळे चिमुकल्या मुलीच्या शरीरात गंभीर संसर्ग पसरला होता. प्रकाश झा यांनी सर्वप्रथम तिच्यावर रुग्णालयात उपचार केले. त्यानंतर आवश्यक सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांनी तिला दत्तक घेतले. त्यांच्या पत्नी दीप्ती नवल यांनीही यात त्यांना पूर्ण साथ दिली. दोघांनी मिळून त्या बाळाला दत्तक घेतले आणि तिचे नाव ठेवले दिशा झा. दिशा झा ने आज स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
घटस्फोटानंतरही नातं तुटलं नाही
प्रकाश झा आणि दीप्ती नवल यांनी दिशाला दत्तक घेतलं तेव्हा त्यांना स्वतःची मुले नव्हती. काही काळानंतर दीप्ती गर्भवती झाल्या, पण त्यांचा गर्भपात झाला. हा दोघांसाठी प्रचंड धक्का होता. यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा वाढू लागला आणि अखेर ते विभक्त झाले. घटस्फोटानंतर दिशाची कस्टडी प्रकाश झा यांनी घेतली आणि त्यांनीच तिला वाढवले. दुसरीकडे दीप्ती नवल यांचेही दिशासोबत चांगले संबंध आहेत आणि त्या आजही तिच्यासोबत वेळ घालवताना दिसतात.
दिशा आज एक प्रसिद्ध निर्माती आहे. 2019 मध्ये तिने वडिलांसोबत 'फ्रॉड सइय्यां' या चित्रपटाची निर्मिती केली होती. तिची स्वत:ची 'पेन पेपर सीजर एंटरटेनमेंट' नावाची एक निर्मिती संस्था आहे.
