पिट्ट्या भाईला राज ठाकरेंनी विचारला जाब
'मुळशी पॅटर्न' फेम अभिनेते आणि मनसेचे सक्रिय शाखाप्रमुख रमेश परदेशी, जे 'पिट्ट्या भाई' या नावाने ओळखले जातात, त्यांना राज ठाकरेंनी भर मेळाव्यात जोरदार झापल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. रमेश परदेशी यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमातील आपला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या फोटोसोबत त्यांनी ते संघाचे कट्टर कार्यकर्ता असल्याचे सांगितले होते.
advertisement
हा फोटो राज ठाकरेंच्या पाहण्यात आला आणि त्यांनी रमेश परदेशी यांना कार्यकर्त्यांसमोरच खडे बोल सुनावले. राज ठाकरे म्हणाले, "छाती ठोकपणे सांगतोस की मी संघाचा कार्यकर्ता आहे. कशाला टाईमपास करतो? एकाच ठिकाणी कुठे तरी राहा!"
'कुटुंबप्रमुख कान ओढू शकतात' रमेश परदेशींचे स्पष्टीकरण
या घटनेनंतर रमेश परदेशी माध्यमांसमोर आले आणि त्यांनी राज ठाकरेंनी त्यांना झापल्याचे वृत्त फेटाळले, पण सोबतच संघाशी असलेला जुना संबंध स्पष्ट केला. एबीपी माझाशी बोलताना रमेश परदेशी म्हणाले, "राज ठाकरे हे आमचे कुटुंबप्रमुख आहेत, ते आमचे कान ओढू शकतात. मी मनसेचा कार्यकर्ता आहे आणि त्याचबरोबर लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही काम करत आलो आहे." याचबरोबर त्यांनी आवर्जून सांगितले की, 'मी राजसाहेबांचा कार्यकर्ता आहे.'
पदाधिकाऱ्यांनी केली सारवासारव
राज ठाकरे यांच्या बैठकीनंतर मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना राज ठाकरेंनी त्यांना झापल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या. पदाधिकारी म्हणाले, "साहेबांनी कोणताही संताप किंवा खडे बोल सुनावले नसून फक्त आम्हाला निवडणुकीच्या दृष्टीने सूचना केल्या आहेत. पुणे शहरातील मतदार यादी आणि स्थानिक प्रश्नांवर काम करण्याचा अहवाल सोमवारपर्यंत देण्याचे निर्देश साहेबांनी दिले आहेत."
इतर पक्षांच्या ग्लॅमरच्या राजकारणापेक्षा मनसेचे कार्यकर्ते सामान्य लोकांचे प्रश्न घेऊन आंदोलन करतात, असा विश्वासही पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला. राज ठाकरेंनी या पुणे दौऱ्यातून कार्यकर्त्यांना निवडणुकीपूर्वी कामाला लागण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
