महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करतो हे भीषण दुर्दैव : राज ठाकरे
राज ठाकरे आता आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत,"आज फक्त मोठे मोठे महामार्ग, पूल (ज्यावर काही महिन्यात खड्डे पडतात ) आणि चमकदार घोषणा म्हणजे 'विकास' अशी कल्पना सत्ताधाऱ्यांनी रुजवली आहे. यात बाकी कोणाचा विकास होतो की नाही माहित नाही पण सत्ताधाऱ्यांचा विकास नक्की होतो. हे केलं आणि धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की मग शेतकरी असो की इथला मराठी माणूस यांना हवं तसं वापरून फेकून द्यायला हे मोकळे. या राज्यातील शेतकरी तर पार हतबल आहे. एका बाजूला पाऊस झोडपतो आणि दुसऱ्या बाजूला सरकारी यंत्रणा अनास्थेने झोडपते.. याच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मुलांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभं केलं, त्याच महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करतो हे भीषण दुर्दैव आहे. एका बाजूला ग्रामीण भागात शेतकऱ्याला इतकं जेरीस आणायचं की त्याला जमीन विकावीच लागेल आणि दुसरीकडे शहरात मराठी माणसांनाच घरं नाकारायची, त्यांच्या भाषेचा अपमान करणाऱ्यांना अभय द्यायचं, त्यांनी काय खायचं ? काय नाही खायचं यावर बंधन आणणऱ्यांचे लाड करायचे हे सुरु आहे".
advertisement
राज ठाकरे पुढे म्हणाले,"हे सगळं मराठी माणसाला दिसत नाहीये का ? दिसत असेल ही... पण जोपर्यंत तुमच्या मनात याविरोधात चीड निर्माण होणार नाही, आग निर्माण होणार नाही, तोपर्यंत परिस्थिती बदलणं सोडा अजून भीषण होईल. या सिनेमातून ही चीड महेश मांजरेकर, त्यांचे कलाकार आणि त्यांचे लेखक यांनी उत्तम मांडली आहे. हा फक्त चित्रपट नाही तर या टीमच्या मनातील अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता महाराष्ट्रातील जनतेने अनुभवयाला हवी. त्यासाठी माझं तुम्हाला आवाहन आहे की 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' हा चित्रपट जरूर पहा".
'पुन्हा शिवाजीराजे भोसले'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन किती?
महेश मांजरेकर दिग्दर्शित 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' हा चित्रपट 31 ऑक्टोबर 2025 रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या दोन दिवसांत या चित्रपटाने 53 कोटींची कमाई केली आहे. अभिनेता सिद्धार्थ बोडके या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत आहे. आता वीकेंडला या चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होईल.
