आम्ही बोलत आहोत दिग्गज अभिनेत्री राम्या कृष्णनबद्दल. आज जरी आपण राम्या कृष्णन यांना साऊथच्या चित्रपटात साडी आणि मोठ्या कुंकवात पाहत असलो, तरी 1993 मध्ये तिने बॉलिवूडचा 'संजू बाबा' म्हणजेच संजय दत्तसोबत स्क्रीन शेअर केली होती. सुभाष घई यांच्या गाजलेल्या 'खलनायक' चित्रपटात राम्या कृष्णन यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.
या चित्रपटातील 'नायक नहीं खलनायक हूँ मैं' या आयकॉनिक गाण्यामध्ये राम्या यांनी संजय दत्तसोबत केलेला रोमान्स आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. त्या गाण्यातील त्यांचा बोल्ड डान्स आणि संजय दत्तसोबतची केमिस्ट्री पाहून हीच ती शिवगामी देवी आहे का? असा प्रश्न अनेकांना पडतोय.
advertisement
राम्या कृष्णन यांनी केवळ 'खलनायक'च नाही, तर अमिताभ बच्चन आणि गोविंदा यांच्या 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटातही मुख्य भूमिका साकारली होती. त्या काळात राम्या यांनी आपल्या सौंदर्याने बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली होती. विनोद खन्ना, शाहरुख खान यांसारख्या मोठ्या स्टार्ससोबतही त्यांनी काम केलं आहे. मात्र, नंतर त्यांनी आपला मोर्चा साऊथ सिनेसृष्टीकडे वळवला आणि तिथे त्या खऱ्या अर्थाने 'क्वीन' ठरल्या.
राम्या यांनी त्यांच्या करिअरमध्ये 400 हून अधिक चित्रपट केले आहेत. मात्र, राजामौली यांच्या 'बाहुबली' चित्रपटाने त्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली. शिवगामी देवीच्या भूमिकेसाठी आधी श्रीदेवी यांना विचारण्यात आलं होतं, पण त्यांनी नकार दिल्यानंतर ही भूमिका राम्या यांच्याकडे आली आणि त्यांनी या पात्राचं सोनं केलं.
वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही राम्या कृष्णन यांचा पडद्यावरचा वावर एखाद्या तिशीतील अभिनेत्रीला लाजवेल असाच आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'जेलर' चित्रपटातही त्यांनी रजनीकांत यांच्या पत्नीची भूमिका उत्तमरीत्या साकारली आहे. 'खलनायक'मधील ती बोल्ड डान्सर आणि 'बाहुबली'मधील न्यायप्रिय शिवगामी, असा राम्या कृष्णन यांचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे.
