चित्रपटात काम करणारा एक तरुण कलाकार, सौरभ शर्मा, कृष्णा नदीत बुडून मृत्यूमुखी पडला. त्याचा मृतदेह सापडला आहे. ही दुर्घटना मंगळवारी संध्याकाळी घडली. चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर, सौरभ काही मित्रांसह नदीत पोहण्यासाठी गेला होता. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो खोल पाण्यात ओढला गेला. सौरभला पोहता येत होतं, असं सांगितलं जात असलं तरी पाण्याचा प्रवाह आणि खोल डोहाचा अंदाज चुकीचा ठरला.
advertisement
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ बुडतानाचा व्हिडिओही समोर आला आहे. या घटनेनंतर लगेच स्थानिक प्रशासनाला माहिती देण्यात आली. शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम, महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड ट्रेकर्स यांच्या मदतीने शोधमोहीम राबवण्यात आली. मात्र अंधार पडल्यामुळे मंगळवारी रात्री शोध थांबवावा लागला. बुधवारी सकाळपासून पुन्हा शोधमोहीम सुरू झाली आणि तब्बल 36 तासांच्या प्रयत्नांनंतर सौरभचा मृतदेह आढळून आला.
दरम्यान, 'राजा शिवाजी' हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य आणि इतिहासावर आधारित असून रितेश देशमुख स्वतः या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे. जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनीच्या माध्यमातून हा चित्रपट तयार होत आहे.