तथापि, असे असले तरीही मराठी कलाकारांना कमी लेखण्याचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून चालत आला आहे. विशेष म्हणजे मराठीसह हिंदीमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या सई ताम्हणकरनेही या मुद्द्यावर आपली खदखद बोलून दाखवली आहे. काही दिवसांपूर्वी मराठी अभिनेत्रींच्या राऊंडटेबल डिस्कशनचे सेशन आयोजित करण्यात आले होते. या चर्चेत सईने तिचे विचार अगदी मोकळेपणाने मांडले आहेत.
advertisement
सई ताम्हणकरने सांगितली मराठी इंडस्ट्रीची काळी बाजू
प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माते सुहृद गोडबोले यांनी मराठी अभिनेत्रींच्या ऑनलाइन चर्चासत्राचे आयोजन केले होते, ज्यात अभिनेत्री सई ताम्हणकर, मृण्मयी गोडबोले, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी यांनी सहभाग घेतला होता. यावेळी सईने मराठी कलाकारांना खुद्द मराठी कलाकार आणि प्रेक्षकच कशाप्रकारे वागणूक देतात याबाबत मन मोकळं केलं.
सई म्हणाली, "मला वाटतं मराठी कलाविश्वातील लोकांना आपण हवी तशी किंमत देत नाही. आपल्या इंडस्ट्रीतील जी दिग्गज लोकं आहेत, त्यांना आपण साजरं केलं जात नाही. त्याचा खूप मोठा प्रभाव वेगवेगळ्या गोष्टींवर पडतो. उदाहरण द्यायचं, तर मराठी अवॉर्ड फंक्शनमध्ये जेव्हा एखादी बॉलिवूडमधील व्यक्ती येते, तेव्हा आपलीच लोक त्यांच्यासमोर इतका लाळघोटेपणा करतात, की जी २०-२० वर्ष काम केलेली लोकं आहेत, त्यांना आपण फाट्यावर मारतो. यामुळे आपल्याला खूप लहान असल्यासारखी फिलिंग येते. जर तुमचीच लोकं तुम्हाला अशी वागणूक देत असतील, तर तुम्ही याबद्दल काय करणार?"
सई पुढे म्हणाली, "मला असं वाटतं, जे तुमच्याकडे आहे त्याला सेलिब्रेट करा आणि मोकळ्या मनाने सेलिब्रेट करा." मराठी सिनेसृष्टीतील इतकं मोठं नाव असूनही सईने ज्या पद्धतीने इंडस्ट्रीतील ही काळी बाजू मांडली आहे, त्यावरून आता या मुद्द्यावर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
